

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना धक्का बसला आहे. मंत्री कोकाटे यांचे बंधू नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे यांनी गुरूवारी (दि.16) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपाचे मंत्री गिरीश महाजन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा नाशिकमध्ये झाला. लोकसभा निवडणुकीत खासदार राजाभाऊ वाजे यांच्या विजयात भारत कोकाटेंचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने जिल्ह्यातील उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा फटका बसला आहे.
कौटुंबिक कलहामुळे मंत्री कोकाटे यांची साथ सोडत, भारत कोकाटे यांनी 2022 मध्ये शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला होता. भारत कोकाटे यांनी सिन्नर तालुक्यातील सोमठाणे गावाचे सरपंच, तसेच नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन व विशेष कार्यकारी सोसायटी या महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहे. गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे खासदार वाजे यांच्या विजयातील ते प्रमुख शिलेदार होते. या विजयामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांना शब्बासकी देखील दिली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिंदे शिवसेनेत जाण्याची तयारी केली होती. परंतू, अतंर्गत गटबाजीमुळे त्यांनी प्रवेश केला नव्हता. अखेर भारत कोकाटे यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेत, गुरूवारी पक्षात प्रवेश केला. भारत कोकाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
काका- पुतणीत रंगणार सामना?
मंत्री कोकाटे यांच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांची कन्या सीमांतिनी कोकाटे यांच्याकडे पाहिले जात आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून, या निवडणुकीत त्यांच्या प्रवेशापूर्वीच त्यांच्यासमोर राजकीय अडथळे उभे राहू लागले आहेत. सिमांतिनी कोकाटे या सोमठाणे गटातून इच्छूक आहे. हा गट आता ओबीसीसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे. तर, याच गटातून भारत कोकाटे यांनी दोन वर्षांपासून तयारी सुरू केली असून त्याचाच भाग म्हणून त्यांनी भाजप प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाने या गटात भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
मी चार ते पाच वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेत काम केले. पंरतु, कार्यकर्त्यांना पाहिजे तसा न्याय देऊ शकलो नाही. त्यामुळे भाजपात प्रवेश केला असून, पक्षश्रेष्ठी जे सांगतील ते काम करण्यास तयार आहे. मी कोणावरही नाराज नाही. भाऊ माणिकराव कोकाटे यांच्याशी राजकीय मतभेद असून, कौटुंबिक नाही. त्यांनी राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले. मीही स्थान निर्माण करू इच्छितो.
भारत कोकाटे, संचालक, जिल्हा मजूर फेडरेशन, नाशिक
Minister Manikrao Kokate
नाशिक : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तत्कालीन कृषी मंत्री तथा विद्यमान क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे हे सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. मंत्री कोकाटे यांच्या याचिकेनंतर न्यायालयाने पोलिसांना अहवाल सादर करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करा, असे निर्देश न्यायालयाने दिल्याची माहिती ॲड. मनोज पिंगळे यांनी दिली. कोकाटे यांनी आमदार पवारांविरोधात जिल्हा न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. त्याची सूनावणी गुरूवारी (दि. १६) झाली. त्यावेळी न्यायालयाने हे निर्देश दिल्याचे ॲड. पिंगळे यांनी सांगितले.