नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क | राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेला आज शुक्रवार (दि.21) पासून सुरुवात झाली आहे. नाशिक विभागात 486 परीक्षा केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या चार जिल्ह्यांतील 2 हजार 828 शाळांमध्ये दहावीची परीक्षा होत आहे. विभागातून 2 लाख 2 हजार 627 परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा कॉपीमुक्त अभियान यशस्वी होण्यासाठी तीसपेक्षा जास्त भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेविषयी असणारी भीती पाहता राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने मदतवाहिनी देखील सुरू केली आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विभागीय मंडळाच्या 253-2950410 या क्रमांकावर विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षेचा अभ्यास करतांना विद्यार्थ्यांवर येणारा ताण पाहता स्वतंत्र मदतवाहिनी सुरू करण्यात आली आहे.
मदतीसाठी नाशिक जिल्ह्याकरिता किरण बावा (94231 84141),
धुळ्यासाठी नंदकिशोर बागूल (94208 52531),
जळगावसाठी दयानंद महाजन (77680 82105) आणि
नंदुरबारसाठी राजेंद्र माळी (94047 49800) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.