

Beltagavan area under terror of five leopards since a fortnight
देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
बेलतगव्हाण परिसरात पाचपेक्षा अधिक बिबटे सक्रिय असून, अनेक ठिकाणी त्यांचा मुक्त संचार सुरू आहे. दत्त मंदिर, कुटे मळा या परिसरात गेल्या आठवड्याभरात अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडणारे विवटे थेट झाडांवर तीन ते चारच्या संख्येने दिसून येत आहेत. सायंकाळच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या ग्रामस्थांवर हल्ले करणारे बिबटे अधिकच धोकादायक ठरू लागले आहेत. त्यामुळे वनविभागाने संपूर्ण परिसरात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे माहिती घेऊन पाच ते सहा पिंजरे लावण्याची मागणी सरपंच मोहनिश दोंदे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
मागील पंधरवड्यात कुटे पाळदे, पागेरे मळ्यात धुमाकूळ घालणारे बिबटे आता अधिकच सक्रिय झाल्याचे दिसून येत आहेत. रमेश महानुभाव यांच्या मळ्यालगतच्या झाडावर एकाच वेळी तीन विवट्यांचे दर्शन नागरिकांना झाले, तर दत्त मंदिर परिसरातील योगेश खाडे यांना सकाळी सात वाजता रस्ता ओलांडताना दोन बिबट्यांचे दर्शन झाले. गेल्या आठवड्यात अशोक कुटे यांच्या मळ्यात बिबट्या घुसल्याने परिसरात घबराट निर्माण झाली.
तसेच उकडे यांच्या मकाच्या शेतातदेखील बिबट्याचे वास्तव्य असल्याने तेथील नागरिक भयभीत झाले आहेत. मागील आठवड्यात गावातील संतोष चिकने हे सायंकाळी सात वाजता नाल्यावरून जात असताना बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतली. मात्र, वेळीच त्यांनी पुलावरून उडी घेतल्याने थोडक्यात त्यांचे प्राण वाचले. तीन दिवसांपूर्वी परसराम मांडे यांच्या बंगल्याच्या भिंतीवर तीन तास बिबट्याने मुक्काम ठोकला होता. त्यावेळेस सरपंच दोंदे यांनी वनविभागाला माहिती देऊनही ते वेळेत पोहोचले नाही. त्यामुळे या विवट्याला पकडता आले नाही.