काळजी घ्या! पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये 'झिका' संसर्ग?

खुटवडनगरमधील ८५ वर्षीय वृद्धास लागण झाल्याचा संशय
Zika Virus
Zika Viruspudhari file photo
Published on
Updated on
नाशिक : आसिफ सय्यद

पुण्यात 'झिका' व्हायरसने दहशत माजविली असतानाच नाशिकच्या सिडको भागातील खुटवडनगर परिसरातील ८५ वर्षीय रुग्णाला या आजाराची लक्षणे आढळल्याने महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. झिका नियंत्रणासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करत रुग्ण आढळलेल्या परिसरात घरोघरी तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. (Rapid response teams are being formed for Zika control and door-to-door screening campaigns are being carried out in affected areas)

जून महिन्यात पुण्यातील एरंडवणा परिसरात सर्वप्रथम झिका व्हायरसचे तीन रुग्ण आढळले होते. ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या १५ वर्षीय मुलीला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे सुरुवातीला निदान झाले होते. त्यानंतर झिकाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेला. झिकाग्रस्तांची संख्या आता शंभराच्या घरात पोहोचली आहे. नाशिकमधून पुण्यात तसेच पुण्यातून नाशिकमध्ये दररोज शेकडो जण कामानिमित्त, शिक्षणासाठी ये-जा करीत असतात. त्यामुळे पुण्यातील झिका आजाराचा संसर्ग नाशकातही बळावण्याचा धोका आहे. त्यातच खुटवडनगर भागातील ८५ वर्षीय वृद्धाला झिकासदृश आजाराची लक्षणे आढळल्याने खळबळ उडाली आहे. या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रक्तनमुने तपासण्यात आल्यानंतर झिकाचा संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला गेला. यासंदर्भातील माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळविण्यात आल्यानंतर संबंधित रुग्णाचे रक्तनमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्राकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

झिका म्हणजे काय?

झिका हा डासांपासून पसरणारा विषाणू आहे. १९४७ मध्ये युगांडाच्या झिका जंगलात तो प्रथम आढळला होता. २०१५ मध्ये अमेरिकेत, विशेषतः ब्राझीलमध्ये लक्षणीय उद्रेक झाल्यानंतर या विषाणूने जागतिक पातळीवर सर्वांचे लक्ष वेधले. हा सार्वजनिक आरोग्यासाठी धोक्याचा इशारा ठरला. एडिस एजिप्ती नावाच्या डासामुळे झिका व्हायरसचा संसर्ग होतो.

Zika Virus
सावधान! राज्यात झिका वाढतोय; मुंबईत एन्ट्री

२३ गर्भवतींची तपासणी

गर्भवती महिलांना या झिका विषाणूंपासून सर्वाधिक धोका असतो आणि त्यांच्या बाळावरही त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने खुटवडनगर परिसरातील २३ गर्भवती महिलांची तपासणी केली. सुदैवाने यातील एकाही गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले नाही.

महापालिका अलर्ट मोडवर

झिका संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सावधगिरी बाळगत प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे. कीटकजन्य आजारांवर नियंत्रणासाठी महापालिकेच्या माध्यमातून धूर, जंतुनाशक फवारणी केली जात आहे. साथरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. वैद्यकीय पथकांमार्फत घरोघरी भेटी देऊन संशयित रुग्णांविषयी माहिती घेतली जात आहे.

झिका संसर्गाची लक्षणे

झिका व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला ताप येणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांतील बुबुळाच्या पुढील भागामध्ये जळजळ होणे, स्नायुदुखी, सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे आढळतात.

झिका संसर्ग टाळण्यासाठी उपाय

झिका व्हायरसचा संसर्ग डासांपासून होतो. त्यामुळे आपल्या परिसरात डास निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आठवड्यातून किमान एकदा घरातील पाण्याची सगळी भांडी रिकामी करून स्वच्छ करावी. फुलदाणी, फ्रीज, कूलरचा ट्रे तसेच घराच्या परिसरात नारळाच्या करवंट्या, निकामी टायर्स आदी ठिकाणी पाणी साचू देऊ नये.

झिका, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांना दक्षता घेणे गरजेचे आहे. साथरोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात आहेत.

डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, नाशिक महापालिका .

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news