

नाशिक : शहरात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पांडवलेणी परिसरातील कवठेकरवाडी भागात अवैध वसाहत उभारून राहणाऱ्या ६ बांगलादेशी महिलांना इंदिरानगर पोलिसांनी शुक्रवारी (दि. २६) ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शहरातील अवैध घुसखोरी आणि त्यामागील एजंटांची साखळी पुन्हा चर्चेत आली आहे.
ताब्यात घेतलेल्या महिलांकडे कोणतेही वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा भारतात वास्तव्यास परवानगी देणारी कागदपत्रे आढळून आलेली नाहीत. त्यांनी बेकायदेशीररीत्या आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून किंवा तथाकथित 'डंकी रूट'चा वापर करत भारतात प्रवेश केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक तपासात या महिला कोलकाता, सूरत, मुंबईमार्गे नाशिकमध्ये दाखल होऊन येथे स्थायिक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात परकीय नागरिक कायदा, पासपोर्ट कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सखोल तपास सुरू आहे. या महिलांचा नाशिकमध्ये नेमका उद्देश काय होता, याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
प्राथमिक चौकशीत काही महिला ब्यूटी पार्लर, हॉटेल तसेच इतर अवैध उद्योगांत काम करत असल्याचे उघड झाले आहे. तपासात या महिलांना नाशिकमध्ये लियाकत हमीद कुरेशी व बॉबी या एजंटांनी आसरा दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था कोणी केली, यामागे कोणती मोठी एजंटांची साखळी कार्यरत आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. याप्रकरणी परकीय नागरिक नोंदणी कार्यालय तसेच केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणांशी पत्रव्यवहार पोलिसांनी सुरू केला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित महिलांना देशाबाहेर पाठविण्याच्या प्रक्रियेबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
नाशिकमध्ये यापूर्वी दाखल तीन स्वतंत्र गुन्ह्यांत १२ अवैध बांगलादेशी महिला आढळल्या होत्या. काही प्रकरणांत डिपोर्टेशनची प्रक्रिया पूर्ण झाली असून, काही गुन्हे अद्याप न्यायप्रविष्ट आहेत. वाढत्या घुसखोरीच्या घटनांमुळे शहराच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या अवैध वास्तव्यास आळा घालण्यासाठी अधिक कठोर उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे. तपासासह डिपोर्टेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत शहरातून अनेक बांगलादेशी महिला ताब्यात घेण्यात आल्या आहेत. काही प्रकरणांत डिपोर्टेशन, तर काही गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत.
ताब्यातील बांगलादेशी महिलेचे नाव शिल्पी
शिल्पी मोहम्मद शुकरअली अकथेर उर्फ शिल्पी अकथेर (२५), सौम्या संतोष नायक उर्फ सुलताना शब्बीर शेख (२८), मुनिया खातून टुकू शेख (२९), सोन्या कबीरूल मंडल उर्फ सानिया रौफिक शेख (२७), मुक्ता जोलील शेख (३५), श्यामोली बेगम उर्फ श्यामाेली सामसू खान (३५)