

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली डेरेदार वृक्षांची कत्तल करायची अन् दुभाजकांवर जागोजागी येड्या बाभळीचे झाडे वाढवायची, असे प्रकार नाशिकमध्ये सुरू आहेत. कुंभमेळ्याच्या कामात कसलीही शिस्त नाही. जागोजागी शहर खोदून ठेवल्याने, सुंदर नाशिक बकाल झाले आहे. त्यामुळे येथे महापालिका प्रशासन आहे काय, असा प्रश्न पडतो, अशा शब्दात काँग्रेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सिंहस्थ कामांवरून प्रशासन आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.
काँग्रेसचे नूतन शहराध्यक्ष बबलू खैरे यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी, नियोजनशून्य सिंहस्थ कामांमुळे नाशिककर वेठीस धरले जात असून, त्यांच्या पाठीशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. प्रशासनाला काँग्रेस कार्यकर्त्यांची भीती वाटायला हवी.
नगरसेवकांनादेखील गुलाबपुष्प देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाब विचारायला हवा. सिंहस्थाचे कामे गुणवत्तेची झाली पाहिजेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी उभे राहा, जिथे चुकीचे कामे होत असतील, तिथे आरडाओरडा करा. जनता बरोबर आली की, ताकद मिळेल. पुढचा काळ काँग्रेसचाच असेल, त्यामुळे जोमाने कामाला लागा.
असे आवाहनही त्यांनी केले. तसेच भाजपवर निशाणा साधताना थोरात म्हणाले, काँग्रेसचे तत्त्वज्ञान शाश्वत आहे. त्यामुळे धर्माचे, जातीचे राजकारण थांबवावे लागेल, लोकशाही वाचवावी लागेल. देशात जो भ्रष्टाचार सुरू आहे, तो थांबविण्यासाठी आपल्याला पुढे यावे लागेल. आपल्या मतदारांना वगळण्याचा डाव भाजप खेळत आहे.
अशावेळी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जागरूकपणे या सर्व बाबींवर लक्ष ठेवून, जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचेही थोरात म्हणाले. यावेळी खासदार शोभा बच्छाव, डॉ. कैलास कमोद, निरंजन टकले, विजय राऊत, राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, तानाजी गायधनी, ज्ञानेश्वर गायकवाड, डॉ. दिनेश बच्छाव, वत्सला खैरे, उल्हास सातभाई, लक्ष्मण जायभावे, सिराज कोकणी आदी उपस्थित होते.
नाशिकरोड ते काँग्रेस कमिटी
दीड तासाचे अंतर कुंभमेळा कामांसाठी केलेल्या खोदकामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे कसे नियोजन कोलमडले याविषयी सांगताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाशिकरोड ते काँग्रेस कमिटीपर्यंत येण्यासाठी दीड तासाचा अवधी लागला. नाशिक हे माझे आवडते शहर आहे. येथील हवा शुद्ध आहे. विचारवंतांचे हे शहर आहे. मात्र, विनाशिस्त कामे केली जात असल्याने या शहराची प्रचंड वाईट अवस्था झाली आहे.
स्थानिक काँग्रेस नेते एकत्र
काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी कधीही लपून राहिली नाही. पक्षात मोजकेच नेते उरले असून, त्यांच्यातदेखील गटबाजी आहे. मात्र, बबलू खैरे यांच्या शहराध्यक्षपदाच्या पदग्रहण सोहळ्यात अनेक स्थानिक नेते एकाच व्यासपीठावर आल्याने, कार्यकर्ते काहीसे सुखावल्याचे दिसून आले. माजी शहराध्यक्ष आकाश छाजेड यांची अनुपस्थिती अनेकांना खटकली. मात्र, त्यांनी अगोदरच अल्पसंख्याक विभागाच्या पूर्वनियोजित बैठकीसाठी दिल्ली येथे जात असल्याचे स्पष्ट केल्याने यावरून फारशी चर्चा रंगली नाही.