नाशिक : लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी मतदान करताना आमचे बटण दाबले पाहिजे. तुम्हाला निवडणुकीत महायुतीच्या पक्षाचे बटण दाबायचे आहे, असे ते म्हणाले. याचा अर्थ असा आहे की, त्यांना बहीण नाही तर सत्ता लाडकी आहे. असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थाेरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. आ. थोरात नाशिकला कार्यक्रमानिमित्त आलेले असताना त्यांनी विविध विषयांवर मत मांडले.
आ. थोरात म्हणाले, सत्ता मिळवण्यासाठी महायुतीची केविलवाणी धडपड सुरू आहे. मात्र, जनता हे सर्व ओळखून आहे. अजित पवारांच्या जनसंवाद यात्रेत सर्वत्र गुलाबी रंग दिसत आहे. मात्र, रंग गुलाबी करून काय उपयोग आहे? लोकांनी सगळं तुमचं अनुभवलेले आहे. त्याचा ठसा एवढा उमटलेला आहे की, आता गुलाबी करून काही होईल, असं वाटत नसल्याची टीका थोरात यांनी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत थोरात म्हणाले की, आम्ही दोन दिवसांपूर्वीच सकारात्मक चर्चा केली आहे. पुढच्या बैठकीत आम्ही आणखी चर्चा करू, लवकरच जागा निश्चित होतील. महाविकास आघाडी म्हणून आम्ही 288 जागा लढू. त्यामध्ये मित्रपक्षांचाही सहभाग असेल. विधानसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या मताधिक्क्याने जिंकू, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीची मते कमी करण्यासाठी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून काही लोकांची धडपड सुरू आहे. महायुतीतील लोकांकडून तसा प्रयत्न होत असल्याचा आरोप थोरात यांनी केला. भावी मुख्यमंत्री म्हणून आज सर्वांनीच बॅनर लावले तरी हरकत नाही, असा टोलाही थोरात यांनी लगावला.
नाशिक-मुंबई महामार्गाची अवस्था दयनीय झाली आहे. नाशिक-मुंबई हा प्रवास तीन तासांत व्हायचा आता पाच-सहा तास लागतात. कधी कधी तर एकाच जागेवर पाच तास लागतात. रस्त्यात खड्डे असतात, वाहतूक कोंडी असते. इतकी वाईट परिस्थिती यापूर्वी पाहिली नव्हती. सरकारचं नागरिकांच्या प्रश्नांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. त्यांना केवळ मतांचे, सत्तेचे पडलेले आहे. मागच्या वर्षी मी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी सांगितले की, ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे रस्ता चांगला करू. यावर्षी पुन्हा हा प्रश्न उपस्थित केला तर त्याचे उत्तर अजून सापडलेलं नाही. शासन म्हणून नियंत्रण पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे. या परिस्थितीवर नाशिककर आणि मुंबईकर प्रचंड नाराज असल्याचा दावा थोरात यांनी केला.
विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग प्रकरणी हाय कमांड निर्णय घेणार आहे. आम्ही या घटनेचा तपशील दिल्लीस पाठवला आहे. त्यानुसार पक्षश्रेष्ठी पुढील निर्णय घेतील. आम्हाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.