

नाशिक : 'बरे झाले राज ठाकरे यांना नाशिककरांनी नाकारले. त्यानिमित्ताने का होईना त्यांना कळले सत्ता हातात असलेल्यांनी दत्तक शहराची कशी वाट लावली. शहराच्या झालेल्या बकालपणाचा जाब विचारण्यासाठी तसेच सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध नोंदविण्यासाठी ठाकरे शिवसेना तसेच मनसेने हा संयुक्त मोर्चा काढल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.
जनआक्रोश मोर्चानिमित्त नाशिकमध्ये आलेल्या नांदगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'नाशिक ही राज ठाकरे यांची जन्मभूमी नसली तरी कर्मभूमी आहे. नाशिकविषयी त्यांना आंतरिक ओढ आहे. या ओढीतूनच केवळ ४० नगरसवेक असताना शहरात बोटॅनिकल गार्डन, गोदापार्क असे प्रकल्प आणले. मात्र, नाशिककरांनी राज यांना नाकरले याची खंत वाटते. ज्यांनी नाशिकला दत्तक घेतले, त्यांनी याकडे गांभीर्याने पाहावे. शहरात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. शहराला अमली पदार्थांचा विळखा पडला आहे. शाळा, महाविद्यालय, टपरीपर्यंत अमली पदार्थ पोहोचले आहेत. देशाचे भवितव्य धोक्यात असताना मुख्यमंत्री काय करतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
कुंभमेळा काही वर्षांवर आलेला असताना शासन म्हणते कामे झाली. पण दिसत नाहीत. अजूनही मुख्यमंत्र्यांना चांगले काम करण्याची संधी आहे. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळेल, पण शहरातील उद्ध्वस्त झालेले प्रकल्पही नव्याने सुरू होतील. प्रवीण गेडामसारखा सक्षम अधिकारी या ठिकाणी आहे. त्यामुळे कामे चांगलीच होतील, असा विश्वास नांदगावकर यांनी व्यक्त केला.