नाशिक : उद्धव आणि राज ठाकरे भेटले, त्यात चुकीचे काय आहे? लोकांच्या प्रश्नांवर त्यांना दिशा देण्यासाठी ते काम करीत आहेत. 'महाराष्ट्राचा नेपाळ होईल', असे विधान केले म्हणून शिंदे गटाचे लोक माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. मात्र, मी काय चुकीचे बोललो? महाराष्ट्राचा नेपाळ होऊ नये म्हणूनच ठाकरे बंधु एकत्र येत आहेत, असे विधान ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाही केली.
ठाकरे सेना आणि मनसेच्या वतीने शुक्रवारी (दि. १२) काढण्यात आलेल्या संयुक्त मोर्चासाठी नाशिकमध्ये आलेल्या राऊत यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात नेपाळपेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. जो पक्ष भ्रष्टाचारातून तयार झाला आहे, त्याच्याविरोधात आम्ही बोलणारच आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेपाळचा उल्लेख केला म्हणून आम्ही माओवादी विचारसरणीचे असल्याचे म्हणतात. मात्र, नेपाळमध्ये कुठे माओवाद आहे? नेपाळ हिंदू राष्ट्र आहे. भ्रष्टाचाराविराेधात लढणाऱ्यांना विचारसरणी नसते. माओवादाविषयी एवढाच तिरस्कार असेल, तर पंतप्रधानांनी चीनला जाऊ नये. माओवादाबाबत माझा जितका अभ्यास आहे, तितका मुख्यमंत्री फडणवीस यांचाही नाही. त्यामुळे त्यांनी माझ्यासोबत डिबेट करू नये, असेही राऊत म्हणाले.
नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली, पाण्याचा प्रश्न, नागरी सुविधांचा प्रश्न, ड्रग्जचा प्रश्न अत्यंत गंभीर होत आहे. अशावेळी गृह खाते काय करते? मुख्यमंत्री फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतले आहे. नाशिकची काय अवस्था झाली, हे त्यांनी आपल्या पक्षातील नव्हे, तर विरोधी पक्षाच्या चार स्थानिक नेत्यांसोबत जाणून घ्यावे म्हणजे त्यांना नाशिकचा नेपाळ झाल्याची जाणीव होईल. भ्रष्टाचार, आराजक, दादागिरी, मस्तवालपणा वाढल्यानेच आम्ही मनसेला सोबत घेऊन हा मोर्चा काढत आहोत. या शहरात मनसेचे आमदार, महापौर राहिला आहे. त्यांची ताकद आहे. त्यामुळे आम्ही मनसेला सोबत घेतले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटदेखील आमच्यासोबत असून, पुढच्या मोर्चात त्यांनाही आणणार असल्याचे राऊत म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील लोकांनी मोहीम उघडली आहे. हे तेच लोक आहेत, ज्यांनी आमच्याविरोधात, राहुल गांधींविरोधात मोहीम उघडली आहे. जेव्हा गडकरी यांना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्मची संधी मिळत होती, तेव्हा या लोकांनी मोर्चे काढून त्यांना मिळू दिली नाही. त्यामुळेच मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. गडकरी सक्षम आहेत, त्यांनी त्यांच्याविरोधात लढा द्यावा, असेही राऊत म्हणाले. तसेच माजी उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांचे अखेर दर्शन झाले असून, ते तोंड कधी उघडतील याची प्रतीक्षा असल्याचेही राऊत म्हणाले.