नाशिक : बकरी ईदच्या सामूहिक नमाज पठणानंतर ईदगाह मैदानावर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकविण्यात आल्याची गंभीर घटना नाशिकमध्ये घडली. विशेष म्हणजे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असताना देखील हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शनिवारी (दि.७) शहर परिसरात ईदचा मोठा उत्साह दिसून आला. शाहजहाॅंनी ईदगाह मैदानावर ईदच्या सामूहिक नमाजपठणाचा सोहळा पारंपरिकरीत्या पार पडला. नमाज पठणानंतर खुतबा, फातेहा पठण झाले. दुआ पठणाने नमाजची सांगता झाली. मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारीही उपस्थित होते. पोलिस आयुक्तालयाचे प्रतिनिधी म्हणून पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, मुंबई नाका ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष नरोडे यांनी शहर-ए-खतीब हिसामोद्दीन अशरफी यांना प्रातिनिधीक स्वरूपात शुभेच्छा दिल्या.
या पोलिस अधिकाऱ्यांची पाठ फिरताच नमाजपठणासाठी आलेल्या गर्दीतील एका व्यक्तीने पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावला. पॅलेस्टिनी नागरिकांवर इस्त्रायलकडून होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा निषेध करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे विदेशी ध्वज फडकविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.