जुने नाशिक : मुस्लीम बांधवांची बकरी ईद अर्थात 'ईद-उल-अज्हा' शनिवारी (दि. ७) शहर - जिल्ह्यात साजरी होत आहे. शहाजहानी ईदगाह मैदानावर सकाळी ९.३० वाजता शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाजपठण पार पडले. त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.
बकरी ईद हा मुस्लीम समाजासाठी त्याग व बलिदानाचे प्रतीक मानला जाणारा महत्त्वाचा सण आहे. इस्लामिक पंचांगानुसार जिलहज्ज महिन्याच्या दहाव्या दिवशी तो साजरा केला जातो. शनिवार (दि.7) रोजी ईदच्या दिवशी सकाळी सामूहिक नमाजपठणानंतर जनावरांची कुर्बानी देण्यात आली. यंदा मान्सूनचे 12 दिवसांपूर्वीच आगमन झाल्याने व पावसाळी वातावरण असल्याने ईदगाह मैदानावर नमाजासाठी येताना रेनकोट, छत्री अथवा तत्सम साहित्य बरोबर बाळगावे, असे आवाहन शहर-ए-खतीब यांनी केले होते.
दरम्यान, ईदगाह मैदानावर बांधवांकरीता 'वुजू'करिता पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जनावरांच्या कुर्बानीसाठी महापालिकेतर्फे तात्पुरत्या कत्तलखान्यांना परवानगी देण्यात आली असल्याने या ठिकाणी पारंपरिक प्रथेनुसार प्राण्यांची कुर्बानी दिली जात आहे. ईदच्या पार्श्वभूमीवी मुस्लीम बांधवांनी नवे कपडे खरेदी केले तर बालगोपाळांमध्ये ईदचा उत्साह अधिक पाहावयास मिळतो आहे.
धार्मिकदृष्ट्या बकरी ईदला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रेषित हजरत इब्राहिम व त्यांचे पुत्र हजरत इस्माईल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बकरी ईदपासून पुढे सलग तीन दिवस 'कुर्बानी' करण्याची प्रथा आहे. याचदरम्यान हज यात्राही पूर्ण केली जाते.
बकरी ईदनिमित्त शनिवारी (दि.7) रोजी सकाळी पारंपरिक पद्धतीने जुने नाशिकसह वडाळा रोड, अशोका रोड, सिडको, सातपूर, वडाळागाव, नाशिक रोड, देवळाली गाव, भगूर आदी उपनगरीय भागांमधील मशिदींमध्येही नमाजपठणाचे नियोजन करण्यात आल्याने शांततेत नमाज अदा करण्यात आली. मशिदीच्या प्रमुख धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली हे नमाजपठण संपन्न झाले.