

ठळक मुद्दे
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप
शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन गट भिडले
उद्योगमंत्री उदय सामंत: पक्षशिस्त मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही
Two groups clashed at a meeting of Shiv Sena Shinde faction office bearers in North Maharashtra
नाशिक : शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन गट आपापसांत भिडल्याने तुफान राडा झाला. अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा पार पडल्यानंतर हा प्रकार घडला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप झाल्याने दोन गट आपापसांत भिडले. या राड्यादरम्यान दोन्ही गटांतील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांची कॉलर पकडत शिवीगाळ केल्याने भांडण सोडविण्यासाठी पोलिस आणि सुरक्षारक्षकांना हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान, या प्रकरणाची पक्षाने गंभीर दखल घेतली असून, पक्षशिस्त मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पक्षाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
हॉटेल एक्स्प्रेस इन येथे शिवसेना शिंदेगटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि खासदार राहुल शेवाळे हॉटेलमध्ये उपस्थित होते. या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा सुरू असताना या वादाला सुरुवात झाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप एका गटाने केल्यानंतर दुसऱ्या गटाने आक्षेप घेतला. अहिल्यानगरचे शहरप्रमुख सचिन जाधव आणि बाबू शेठ यांच्यात राडा झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी उपस्थित पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शिंदेसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
दरम्यान, यासंदर्भात संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदेगटाचे आमदार अमोल खताळ म्हणाले की, सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चेला उपस्थित होते. आतमध्ये वाद झालेला नाही, बाहेर झाला असेल तर मला माहीत नाही. पक्षाच्या स्तरावर मुख्य नेते एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील. सचिन जाधव हे आमचे पदाधिकारी आहेत. वादाची मला कोणतीही माहिती नाही, मी माहिती घेतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मंत्री उदय सामंत या प्रकरणावर टिप्पणी करताना म्हणाले की, ज्या व्यक्तीच्या समर्थकांनी हे कृत्य केले, त्याची गंभीर दखल घेतली आहे. पक्षाकडून त्यांची गय केली जाणार नाही. या घटनेचा अहवाल पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना देणार आहे. किरकोळ वाद आहे, गैरसमजामधून हे झाले आहे. संबंधितांना आम्ही समज दिली आहे. ही बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी होती. आम्ही भिंग घेऊन इतर लोकांना शोधून काढू, असे त्यांनी सांगितले.