

MLA Asif Shaikh Controversy Statement
नाशिक : मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी औरंगजेबविषयी वादग्रस्त विधान करून नवा वाद ओढवून घेतला आहे. औरंगजेबने प्रामाणिक जीवन जगले. सर्वधर्म समभाव ठेवला. टोप्या शिवून ते आपला उदरनिर्वाह करायचा. आणि दोन वेळेचे जेवण करायचे, ते एक पवित्र व्यक्ती होते. परंतु राजकारणासाठी त्यांना बदनाम केले जात आहे, असे शेख यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मालेगाव येथे मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या वतीने उत्तर महाराष्ट्र चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेख पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, माझ्या विधानावर मी ठाम आहे. जे आहे ते आहे, तेच मी सांगितले आहे. आम्ही संविधानाला मानणारे आणि या देशावर प्रेम करणारे आहोत, असे त्यांनी सांगितले.
शेख यांनी इस्लाम (इंडीयन सेक्युलर लार्जेस्ट असेंबली ऑफ महाराष्ट्र) नावाचा राजकीय पक्ष काढला आहे. त्यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवली आहे. शेख हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. मधल्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा राजीनामा देऊन त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी शेख यांचा थोड्या मतांनी पराभव केला होता.
दरम्यान, शेख यांच्या वादग्रस्त विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आम्ही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला आहे. ओरंगजेबचा इतिहास वाचलेला नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.