चांदवड- देवळा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो. येथून आपलाच आमदार निवडून यावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू आहे. मागील ४० वर्षांच्या राजकीय वाटचालीवर प्रकाशझोत टाकल्यास या मतदारसंघात जवळपास २५ वष भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. तर दोनवेळा राष्ट्रवादी आणि एकदा अपक्ष उमदेवार निवडणून आलेला आहे. सध्या भाजपाचे डॉ. राहुल आहेर हे 'हॅट्रिक' साधण्यासाठी ताकद पणाला लावणार हे निश्चित आहे. तर त्यांची 'हॅट्रिक' रोखण्यासाठी महाविकास आघाडीने देखील कंबर कसली आहे.
चांदवड आणि देवळा हे दोन तालुके मिळून या मतदारसंघाची रचना झालेली आहे. चांदवड तालुक्यात सुमारे २ तर देवळ्यात १ लाख असे एकूण ३ लाख मतदार संख्या आहे. यामुळे चांदवड मोठा तर देवळा लहान भाऊ मानला जातो. २०१४ च्या निवडणुकीत देवळा तालुक्यातून डॉ. राहुल आहेर तर चांदवड तालुक्यातून शिरीषकुमार कोतवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे, नितीन आहेर, उत्तमबाबा भालेराव हे चार मातब्बर उमेदवार रिंगणात होते. यामुळे चांदवड तालुक्यातील मतांचे विभाजन होऊन देवळा तालुक्यातून डॉ. राहुल आहेरांनी मताधिक्य घेत विजयश्री खेचून आणली होती. २०१९ साली देखील डॉ. राहुल आहेर व माजी आ. शिरीषकुमार कोतवाल यांच्यात सरळ लढत होऊन डॉ. आहेरांनी बाजी मारली.
चांदवड- देवळा मतदारसंघात डॉ. आहेर यांनी गेल्या दहा वर्षांत वाढविलेला दांडगा जनसंपर्क वाढवीत गावागावात माणसे जोडली आहेत. स्थानिक राजकीय मतभेद बाजूला सारून त्यांनी गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष दिल्याची भावना जनतेमध्ये आहे. शांत, संयमी व मनमिळाऊ स्वभावामुळे डॉ. आहेर सर्वसामान्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. आहेरांना निवडून देण्यात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व नाफेडचे संचालक केदा आहेर यांचा मोठा वाट आहे. स्वर्गीय दौलतराव आहेरांना दिलेल्या शब्दामुळे 'आमदार' कीचे स्वप्न बाजूला ठेऊन डॉ. आहेरांना निवडून दिले. आता राहुल आहेर यांनी मोठेपणा दाखवून होऊ घातलेल्या निवडणुकीत केदा आहेरांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आमदार बनवावे अशी मागणी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे. आमदारकीचे डोहाळे लागलेल्या केदा आहेरांनी चांदवड व देवळा तालुक्यात आपले संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. काही झाले तरी आता माघार नाही असा 'पण' त्यांनी घेतला आहे. यामुळे या दोन्ही भावातून नेमकी कोण निवडणुकीस सामोरे जाते याकडे विरोधकांसह मतदारराजाचे लक्ष आहे.
डॉ. राहुल आहेर - १ लाख ३ हजार ४५४
शिरीषकुमार कोतवाल – ७५ हजार ७१०
एकूण मतदार संख्या - 300824
स्त्री मतदार -143553
पुरुष मतदार - 157271
एकूण देवळा बूथ संख्या -112
एकूण चांदवड बूथ संख्या -194
याशिवाय चांदवड तालुक्यातून भाजपाचे डॉ. आत्माराम कुंभार्डे, चांदवडचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल हे दोघेही इच्छुक असून त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीकडून माजी आ. शिरीषकुमार कोतवाल यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे. मात्र, त्यांना कॉंग्रेस पक्षाचेच तालुकाध्यक्ष तथा बाजार समिती सभापती संजय जाधव, जिल्हा कॉंग्रेस शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संपतराव वक्ते यांनी आव्हान दिले आहे. यामुळे कोतवाल यांना पक्षातूनच विरोध होताना दिसत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटातून डॉ. सयाजीराव गायकवाड व शिवसेना उबाठा गटातून जिल्हा प्रमुख नितीन आहेर इच्छुक आहेत. नितीन आहेरांनी मतदारसंघात शेतकरी संघर्ष संवाद यात्रा काढली असून त्यांनाही शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीकडून इच्छुकांची भाऊगर्दी बघता पक्षश्रेष्ठीं नेमकी कोणाच्या झोळीत उमेदवारी टाकतात ते बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
प्रहारचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर हे उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत. स्वच्छ प्रतिमा, साधा सरळ स्वभाव, शेतकरी, सर्वसामान्यांसाठी झटणारा व अभ्यासू अशी ओळख असलेले निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यातबंदीविरोधात केंद्र सरकार विरोधात रान उठविले होते. याच दरम्यान त्यांनी तत्कालीन मंत्री डॉ. पवार यांना घेराव घालण्यासाठी शेतकऱ्या समवेत नाशिककडे प्रयाण केले होते. त्यांचा हा ताफा अशोकस्तंभावर पोलिसांनी अडवला होता. हे आंदोलन राज्यभरात गाजले होते. या आंदोलनाचा परिणामही डॉ. भारती पवार यांना निवडणुकीत भोगावा लागला हो सत्य आहे. त्यानंतर निंबाळकर यांनी आपल्या पक्षात यावे यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे यांनी गणेश निंबाळकर यांच्याशी चर्चा केल्याचे देखील वृत्त आहे.
येत्या निवडणुकीत माजी आ. उत्तमबाबा भालेराव निवडणुकीस सामोरे जाणार नसले तरी त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. भालेराव यांचे तालुक्यात मोठे समर्थक आहेत. त्यामुळे भालेराव ज्या उमेदवारासोबत जातील तो उमेदवाराचा पुढील मार्ग बहुतांशी प्रमाणात सुखर होते.