अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या त्र्यंबकेश्वर- इगतपुरी मतदारसंघाने नेहमीच काँग्रेसला कौल दिल्याचा इतिहास आहे. या क्षेत्रात काँग्रेसने प्रभाव राखण्यात यश मिळविले असले, तरी गेल्या काही काळातील बदललेल्या समीकरणांमुळे काँग्रेसला हा बुरूज राखणे नक्कीच सोपे राहिलेले नाही. कारण, येथील गेल्या काही काळातील महायुतीची व्यूहरचना काँग्रेससाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
येथे काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर हे निवडणूक रिंगणात असतील, हे जरी निश्चित असले, तरी ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार हा प्रश्न आहे. मागील विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या काँग्रेस आमदारांमध्ये खोसकर यांचे नाव आल्याने, पक्षाकडून त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला जाईल काय, हा प्रश्न आहे. जर काँग्रेसने आ. खोसकर यांच्या उमेदवारीवर फुली मारली, तर काँग्रेसकडून सक्षम उमेदवार म्हणून कोणाचे नाव पुढे केले जाणार, याचीही सध्या जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या माजी आमदार ठाकरे गटाच्या उपनेत्या निर्मला गावित आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ हेदेखील आमदारकी परत मिळविण्यास उत्सुक आहेत. याव्यतिरिक्त माजी आमदार पांडुरंग गांगड, शिवराम झोले, नयना गावित, कावजी ठाकरे, विनायक माळेकर, भारती भोये, गोपाळ लहांगे, लकी जाधव, उषा बेंडकोळी अशी इच्छुकांची मोठी यादी असून, निवडणूक चुरशीची होईल यात शंका नाही. हा मतदारसंघ वाड्या-वस्त्यांमध्ये विखुरलेला असल्याने हरसूल ठाणापाठा भागात कम्युनिस्टांचा प्रभाव 'टर्न' म्हणून बघितला जातो. पक्षीय ताकदीचा विचार केल्यास त्र्यंबक नगरपालिकेत भाजपची सत्ता होती. इगतपुरीत शिवसेनेचा भगवा, तर ग्रामीण भागात काँग्रेसची ताकद असल्याने, यंदा कौल नेमका कोणाच्या बाजूने झुकणार हे बघणे औत्सुक्याचे आहे.
२०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेतही विजयी पताका फडकविणाऱ्या निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश करताच मतदारांनी त्यांना नाकारले. माजी आ. काशीनाथ मेंगाळ यांच्याबाबतही असेच झाले असून, दोनदा काँग्रेसच्या तिकिटावर आमदारकी मिळविलेले मेंगाळ सेनेत जाताच पराभावाला सामोरे गेले. सध्या हे दोन्ही आमदार ठाकरे आणि शिंदे यांच्या सेनेत असून, तिकिटाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.
नाशिक- मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मतदारसंघाचा विस्तार आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, घोटी, वाडीवऱ्हे आणि गोंदे हे मुख्य भाग येतात. येथील शेतकऱ्याचे प्रमुख पीक भात हे आहे. वाडीवऱ्हे, गोंदे या भागात औद्योगिक वसाहत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे त्र्यंबकेश्वर देवस्थान, संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर, सर्वतीर्थ टाकेद अशी महत्त्वाची तीर्थस्थळे आणि मन:शांतीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेले धम्मगिरी याच मतदारसंघात आहे.
१९८० पासूनचा आढावा घेतल्यास १९८०, १९८५, १९९५, २००९ आणि २०१४ अशा पाच निवडणुकांत येथे काँग्रेस विजयी झाली. १९९९ आणि २००४ या सलग दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा या मतदारसंघावर फडकला. १९९९ मध्ये पांडुरंग गांगड, तर २००४ मध्ये काशीनाथ मेंगाळ यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला. १९९० च्या एकाच निवडणुकीत मात्र यादवराव वांबळे यांच्या रूपाने भाजपचे कमळ फुलले आहे.
२०१९ विधानसभा निवडणुकीतील स्थिती अशी होती
हिरामण खोसकर (काँग्रेस) : ८६,५६१
निर्मला गावित (शिवसेना) : ५५,००६
लकी जाधव (वंचित बहुजन आघाडी) : ९,९७५
योगेश शेवरे (मनसे) : ६,५६६