विधानसभा 2024 | मालेगाव बाह्यमध्ये 'दादां'विरोधात 'आबा' की, 'काका'

मालेगाव बाह्यमध्ये 'दादां'विरोधात 'आबा' की, 'काका'
मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ
मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघpudhari news network
Published on
Updated on
मालेगाव : नीलेश शिंपी

मालेगाव बाह्य मतदारसंघात गत 20 वर्षांपासून 'दादा' असणारे पालकमंत्री दादा भुसे यांना शह देण्यासाठी त्यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक व मित्र, बाजार समितीचे माजी चेअरमन बंडू'काका' बच्छाव हे प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात सक्रिय झाले आहेत, तर नुकतेच नऊ महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आलेले शिवसेनेचे उपनेते अद्वय 'आबा' हिरे यांचे समर्थक हिरे यांना आमदार करण्यासाठी आसुसले आहेत. हिरे यांनी बाहेर येताच सरकारसह स्थानिक लोकप्रतिनिधींवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे यंदाची निवडणूक अटीतटीची होणार हे स्पष्ट आहे.

Summary

2019 मधील मतांची आकडेवारी

  • दादा भुसे (शिवसेना) 1 लाख 21 हजार 252

  • डॉ. तुषार शेवाळे (काँग्रेस) 73 हजार 568

  • आनंद आढाव (बसपा) 2,568

  • अबू गफर मो. इस्माईल (अपक्ष) 11,991

प्रारंभी दाभाडी व नंतरच्या काळात मालेगाव बाह्य म्हणून उदयास असलेल्या या मतदारसंघावर गत चार पंचवार्षिकापासून पालकमंत्री भुसे यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. भुसे यांनी पहिली निवडणूक शिवसेना बंडखोर (अपक्ष) म्हणून लढविली. त्यांनी तत्कालीन परिवहन राज्यमंत्री डॉ. प्रशांत हिरे यांचा पराभव केला होता. त्यानंतर भुसे यांनी शिवसेनेत घरवापसी करीत पुढील तिन्ही निवडणुका मालेगाव बाह्यमधून धनुष्यबाण या चिन्हांवर लढवित विजयश्री खेचून आणली.

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ
विधानसभा 2024 | 'एमआयएम'चा पतंग कापण्यासाठी विरोधक सज्ज!

अडीच वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मालेगाव बाह्य मतदारसंघातील चित्रदेखील बदलले आहे. त्याकाळी भाजपमध्ये असणारे हिरे सत्तांतरानंतर शिवसेना ठाकरे गटात गेले, तर काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे हे 'जय श्रीराम' म्हणत भाजपमध्ये दाखल झाले. शिवसेनेचेच पण अनेक दिवसांपासून राजकारणापासून दूर गेलेले बच्छाव ऐन निवडणूक तोंडावर सक्रिय झाले आहेत. यंदाची निवडणूक महाविकास आघाडी व महायुतीतच होणार असल्याचे आज तरी चित्र दिसत आहे. महायुतीकडून भुसे हेच उमेदवार राहतील यात शंका नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून गेल्या पंचवार्षिकला काँग्रेसचा असणारा हा मतदारसंघ काँग्रेस आपल्याकडे ठेवतो की, ठाकरे गटाला सोडतो, हे पाहावे लागेल.

शिवसेनेत भुसेच सबकुछ

शिवसेना- भाजप युती असताना हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला होता. येथे भुसे यांना शिवसेनेत प्रतिस्पर्धी नसल्याने तेच पाचव्यांदा निवडणुकीला सामोरे जातील. भुसे यांनी पाच कृषी महाविद्यालये, गिरणा-मोसम नदीवर बंधारे, अजंग एमआयडीसीसह अनेक लहान- मोठी नजरेत भरतील अशी विकासकामे केली आहेत. मंत्री असूनही जनतेशी त्यांचा संपर्क तुटलेला नाही. यावेळी भाजपबरोबरच भुसे यांना राष्ट्रवादीची मदत मिळणार असल्याने ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

असे आहेत इच्छुक

गेल्या वेळी येथील जागा काँग्रेसला सुटली होता. यावेळी काँग्रेसकडे प्रसाद हिरे यांच्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार यांचेदेखील नाव चर्चेत आहे. ठाकरे गटाकडून अद्वय हिरे, बंडूकाका बच्छाव हे इच्छुक असल्याने जागा शिवसेनेला सुटते की, काँग्रेसला हे पाहणे औत्सुक्याचे आहे. महायुतीतील भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. नीलेश कचवे, सुनील गायकवाड, कुणाल सूर्यवंशी हे चाचपणी करीत आहेत. लोकशाही धडक मोर्चाचे शेखर पगार हे उमेदवारीवर ठाम आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news