

नाशिक : भोंदू अशोक
खरातच्या विरोधात आरोपांची मालिका सुरूच असून, आता त्याला मंदिर आणि फार्म हाउससाठी जमीन विकणारे माळी बंधू पुढे आले आहेत. भीती दाखवून जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप करत 'आमची जमीन परत द्या' अशी मागणी त्यांनी केली आहे.
अंधश्रद्धा आणि फसवणुकीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या अशोक खरातच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या खरातविरोधात आता जमीन व्यवहारासंदर्भातही गंभीर आरोप समोर आले आहेत.
ईशान्येश्वर मंदिर आणि फार्म हाउस उभारण्यासाठी जमीन विकणारे शेतकरी माळी बंधू कॅमेऱ्यासमोर येत त्यांनी आपली व्यथा मांडली. माळी बंधूंच्या म्हणण्यानुसार, आर्थिक अडचणीमुळे त्यांनी जमीन विकण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांनी अशोक खरातशी संपर्क साधला.
मात्र, या व्यवहारादरम्यान खरातने अंधश्रद्धेचा आधार घेत त्यांना धमकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 'ही जमीन तुम्हाला फळणार नाही, तुमच्यापैकी दोघा भावांचा मृत्यू होईल, त्यामुळे ही जमीन मला विकून टाका,' असे सांगून खरातने भीतीचे वातावरण निर्माण केले, असा दावा त्यांनी केला आहे. या भीतीमुळे आणि त्या काळातील खरातच्या प्रभावामुळे त्यांनी जमीन विक्रीस मान्यता दिली. मात्र, ठरल्याप्रमाणे पूर्ण पैसे मिळाले नसल्याचेही माळी बंधूंनी सांगितले आहे.
जमीन बळकावल्याच्या आरोपाची भर
अशोक खरातविरोधात आधीच फसवणूक, अंधश्रद्धा आणि लैंगिक शोषणाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यात आता जमीन बळकावल्याच्या आरोपाची भर पडल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. माळी बंधूंनी आता उघडपणे न्यायाची मागणी करत आपली जमीन परत मिळावी, अशी भूमिका घेतली आहे. या नव्या आरोपांमुळे तपास यंत्रणांसमोर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा निर्माण झाला असून, खरातच्या व्यवहारांची सखोल चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.