

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू खरात प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने आरोपी अशोक खरात याला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
यामुळे या प्रकरणातील तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. यापूर्वी न्यायालयाने अशोक खरातला ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर बुधवारी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता व्हर्चुअल पद्धतीने सुनावणी घेण्यात आली.
या सुनावणीदरम्यान न्यायाधीश बी. इन. ईचपुराणी यांच्या न्यायालयात प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीत सरकारी वकील शैलेंद्र बागडे, आरोपीचे वकील सचिन भाटे तसेच तपास अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी उपस्थित होते.
सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आरोपीला पुढील गुन्ह्यांच्या संदर्भात विचारणा केली. यावेळी सरकारी पक्षाकडून आरोपीविरुद्ध दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्याचा तपशील मांडण्यात आला. दरम्यान, आरोपीविरुद्ध गुन्ह्यांची संख्या सातत्याने वाढत असून, आणखी तक्रारी समोर येत आहेत. सध्या सुमारे १२ गुन्हे दाखल असताना आणखी ११ तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती समोर येत आहे.
महिलांना भीती दाखवून 'ऊर्जा, विशेष पूजा, शरीरशांती' च्या नावाखाली फसवणूक व लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप अशोक खरातवर आहेत. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे त्याची रवानगी आता नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात येणार आहे. मात्र, विशेष तपास पथक लवकरच त्याचा ताबा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
पुढील गुन्ह्यांत आरोपीचा पोलिस ताबा मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात येणार असून, त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तिसऱ्या गुन्ह्यात ताबा घेण्याचा अर्ज मंजूर झाला असून, गुरुवारी पुन्हा आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या प्रकरणात एसआयटीकडून सखोल तपास सुरू असून, आरोपीच्या आर्थिक व्यवहारांची तसेच त्याच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
शिर्डी परिसरात कोट्यवधींच्या आर्थिक व्यवहारांचा देखील तपास सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खरात ढसाढसा रडला !
१८ मार्च २०२६ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सुरुवातीला पोलिस तपासाला अजिबात सहकार्य केले नाही. मात्र, जसजसे दिवस पुढे गेले चौकशी कसून होऊ लागली तेव्हा खरातचा आत्मविश्वास हा कमी झाला. हा सध्याच्या घडीला चौकशीमध्ये आता ढसाढसा रडत आहे. आपण केलेल्या कृत्याचा कबुलीजबाबही त्याने दिला.