

ठाणे : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीतील १० मानाच्या पालख्यांसोबत येणाऱ्या ११०९ दिंड्याना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यातील गतवर्षी नोंदणी केलेल्या ९०२ दिंड्याच्या खात्यात हा निधी बुधवार (दि.18) रोजी आज वितरित करण्यात आला.
पंढरपूरकडे जाणाऱ्या मानाच्या दिंड्याना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. यावर्षीही आषाढी एकादशीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शासनाने घेतलेल्या बैठकीत वारकऱ्यांच्या विविध संघटना आणि प्रमुख दिंड्यांच्या वतीने पुन्हा एकदा तशीच मागणी शासनाकडे करण्यात आली. या मागणीचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून हा निधी तत्काळ देण्याचे निश्चित करण्यात आले. यानुसार मानाच्या १० पालख्यांमधील ११०९ दिंड्याना देण्यासाठी १ कोटी ८० लाख ४० हजारांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने गतवर्षी नोंदणी केलेल्या दिंड्याना हा निधी आज वितरित करण्यात आला आहे. तर उर्वरित २९१ दिड्यांचा तपशील येत्या काही दिवसात प्राप्त करून त्यानंतर हा निधी त्यांच्याही खात्यात वर्ग केला जाईल, असे सांगण्यात आले आहे.