

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील संत श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या दिंडीचे मंगळवारी (दि.10) पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. यंदा हरित पालखी सोहळा संकल्पना राबविली जाणार असून याअंतर्गत पालखी मार्गस्थावर वृक्ष लागवड केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पालखीला आरोग्य सेवा तसेच सहा टॅंकर, 265 फिरते शौचालये उपलब्ध करून दिले जाणार आहे.
दरम्यान, गुरूवारी (दि.12) नाशिक पंचायत समितीच्या आवारात पालखीचे आगमन होणार आहे. पालखी सोहळयासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पुरविण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. पालखी मार्गावर आरोग्य विभागामार्फत सर्व सेवा पुरविण्यात येणार आहे. ठिकठिकाणी आरोग्य उपचार केंद्र तसेच मार्गावर १०८ व १०२ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, मार्गावरील जलस्त्रोतांचे पाणी शुध्दीकरण, पाणी तपासणीसाठी आरोग्य दूत, पालखी मार्गावर धुर फवारणी करण्यात येणार आहे. जागोजागी वैद्यकीय सेवा उपलब्धतेबाबत आवश्यक अधिकारी यांचे नाव व संपर्क नंबर बॅनरव्दारे प्रदर्शित केले आहे. या मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. इसीजी तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य दूत म्हणून आरोग्य कर्मचारी यांना विशिष्ट गणवेशात नियुक्त केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली.
10 जून : दुपारी 2 ला निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान मंदिरातून प्रस्थान
11 जून : महानिर्वाणी आखाडा, पेगलवाऐडी येथून महिरावणीमार्गे सातपूरला
12 जून : सातपूर येथून नाशिक पंचायत समिती, गणेशवाडी, पंचवटी
13 जून : पंचवटी, मुक्तीधाम, चेहेडी, पळसे
14 जून : पळसे, मोहदरी घाट, पास्तेमार्गे लोणारवाडी
15 जून : लोणारवाडी, सिन्नर, कुंदेवाडी, मुसळगाव दातली (गोल रिंगण)
16 जून : खंबाळे, भोकणी, निर्हळमार्गे अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश
त्र्यंबक-पंढरपूर हा पालखीचा प्रवास 27 दिवसाचा राहणार आहे. शासनाने 300 ई टॉयलेटस्, वॉटरप्रुफ मंडप, आरोग्य सुविधा, 5 रुग्णवाहिका आदी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. दिंड्या ज्याठिकाणी मुक्कामी राहतील. त्या ग्रामपंचायतींना खर्चासाठी सुमारे तीन लाखांचा निधी शासनाकडून वर्ग करण्यात आला.