नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघांसाठी मंगळवार (दि.२२)पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असून, अंतिम मुदत 29 ऑक्टोबरपर्यंत असेल. सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. उमेदवारांनी आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी खर्चाची 40 लाख रुपये निश्चित केली आहे. उमेदवारांनी निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाचा हिशेब ठेवायचा असून, उमेदवारांचे खर्चाचा तपशील तपासणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय खर्च निरीक्षकांची नियुक्ती आयोगामार्फत करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी अर्ज दाखल करताना सर्व बाबींची नोंद घेऊन निर्धारित वेळेत अर्ज दाखल करावे, अशा सूचना जलज शर्मा यांनी केल्या आहेत.
-उमेदवार भारतीय नागरिक असावा.
-उमेदवाराचे वय 25 वर्षापेक्षा जास्त असावे.
-उमेदवाराचे नाव महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारयादीत असावे.
-उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र विहीत नमुना '2B भरावयाचा आहे.
-उमेदवारास निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे शपथ /दृढकथन करावे लागेल.
-शपथपत्र नमुना 26 ( प्रथम वर्ग दंडाधिकारी/नोटरी यांच्या समक्ष स्वाक्षरी करून सादर करावा).
-उमेदवाराने मतपत्रिकेवरील फोटोबाबतचे घोषणापत्र सादर करावे.
-मतपत्रिकेवर नाव कसे असावे याबाबत उमेदवारानी लेखी पत्र द्यावे.
-नामनिर्देशन पत्रासह जमा करावयाची अनामत रक्कम १० हजार रुपये असून, अनुसूचित जाती अथवा जमाती वर्गातील उमेदवारासाठी ५ हजार रुपये रोख स्वरूपात जमा करावी.
-एक उमेदवार जास्तीत जास्त 4 अर्ज दाखल करू शकतात.
-एक उमेदवार दोनपेक्षा जास्त मतदारसंघांत अर्ज करू शकणार नाही.
-उमेदवारास मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा असल्यास १ सूचक; अमान्यताप्राप्त पक्ष किंवा अपक्षास दहा सूचक आवश्यक.
-राजकीय पक्षांचे उमेदवारांनी पक्षाने प्राधिकृत केल्याबाबत विहित सूचना पत्र ( AA & BB ) अर्जासह सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी ३ पूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करणे आवश्यक.
-अर्जासह सादर करावयाचे विहित शपथपत्र नमुना 26 मधील सर्व रकाने भरणे आवश्यक.
-एखादी बाब लागू नसल्यास निरंक/लागू नाही असा तपशील नोंदविणे गरजेचे.
-मंगळवार (दि.२२)पासून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज विहित नमुना 2B शपथपत्र नमुना-26 मिळणार.
उमेदवारांनी साधारणत: तीन महिन्यांचे आतील कालावधीत काढलेला फोटो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्जासोबत किंवा जास्तीत जास्त छाननीच्या वेळेपूर्वी देणे आवश्यक आहे. फोटोचा आकार 2cm बाय 2.5 cm असावा. चेहरा समोर आणि पूर्ण तसेच डोळे उघडे, मागील बाजू पांढऱ्या रंगाची असावी. फोटो रंगीत किंवा ब्लॅक आणि व्हाईट चालेल. उमेदवारांनी सर्वसाधारण कपडे परिधान केलेले असावे. फोटोच्या मागील बाजूला उमेदवाराची किंवा त्याचा निवडणूक प्रतिनिधी यांची स्वाक्षरी असावी. फोटोसोबत विहित नमुन्यातील Annex- 2 (घोषणापत्र) देणे बंधनकारक असेल.