

पुढारी ऑनलाइन डेस्क | शिवसेना ठाकरे गटाचे नेते व निफाड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अनिल कदम हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना आज उधाण आले. काही खाजगी वृत्तवाहिन्यांनी तसे वृत्त दाखवल्याने ही चर्चा सुरु झाली. त्यामुळे निफाड तालुक्याचे राजकीय गोटात एकच खळबळ उडाली.
मात्र, यांसदर्भात स्वत: कदम यांना विचारणा केली असता, आपण भाजपात जाणार असल्याची वार्ता खोटी असल्याचे स्पष्टीकरण कदम यांनी दिले आहे. आपण बाळासाहेब ठाकरेंचे आणि उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक असून मातोश्री सोबत माझी नाळ कायम असल्याचे स्पष्ट करत त्यांनी भाजप सोबत जात असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
अनिल कदम हे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर काही मोजकेच शिलेदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले. त्यात अनिल कदम यांचा समावेश होता. निष्ठेचे फळ म्हणून विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी अनिल कदम यांना पुन्हा तिकीट दिले. मात्र, राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांनी त्यांचा पराभव केला.
विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकांपासून ते आतापर्यंत ठाकरे गटाला लागलेली गळती काही कमी होऊ शकली नाही. काही आठवड्यांपूर्वी कदम यांच्या काही शिलेदारांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे राज्यभर सुरु असेलेलं हे इनकमिंग व आऊटगोईंग पाहाता अनिल कदम ही ठाकरे गटात जाणार म्हटल्यावर अनेकांना धक्काच बसला. मात्र कदम यांनी स्वत:तसे काही नसल्याचे सांगून भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्नविराम दिला आहे.