नाशिक : शिंदे सेनेसोबत केलेल्या युतीमुळे प्रस्थापितांना धक्का देण्याची आणि संविधान वाचविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सत्तेत असल्यास अनेक प्रश्न मार्गी लावता येतात. त्यामुळे शिंदे गटाशी युती करून आपण सत्तेच्या दारापर्यंत पोहोचलो असून, नंतर नशिबाला दोष देण्यापेक्षा या संधीचे सोने करून सत्तेत जाऊ. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन कामाला लागावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले.
महाकवी कालिदास कलामंदिरात शनिवारी (दि.13) आयोजित रिपब्लिकन सेनेतर्फे संविधान हक्क परिषद आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख अविनाश शिंदे होते. व्यासपीठावर महानगरप्रमुख सुनील साळवे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सोनी उजागिरे, डॉ. चंचल साबळे, महासचिव विनोद काळे, प्रकाश खंडागळे, सुशील सूर्यवंशी, माजी नगरसेवक भागवत आरोटे आदी उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, आंबेडकरी समाज आणि तळागाळातील कार्यकर्त्यालाही सत्तेत जाता यावे व लोकहिताचे निर्णय घेऊन विकासासाठी हातभार लावता यावा, यासाठी शिवसेना शिंदे गटासोबत तीन महिन्यांपूर्वी युतीचा निर्णय घेतला. युतीच्या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दाखविण्याची संधी निर्माण झाली असून, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना संधी देण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी अनिल लेहणार आणि राहुल लेहणार बंधूंनी प्रबोधनपर गीतांचे सादरीकरण केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. अविनाश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी पक्ष बळकटीसाठी आर्थिक सहाय्य म्हणून एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
अश्विनी गोस्वामी यांनी सूत्रसंचालन केले. तर सुनील साळवे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी तुकाराम मोजाड, सूरज गांगुर्डे, विशाल हिवराळे, अतुल जाधव, करण दाभाडे आदींनी प्रयत्न केले.
इंदू मिलची उद्या करणार पाहणी
इंदू मिलचा लढा कसा लढला? 6 डिसेंबरला कसा जागेचा ताबा घेतला आणि त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यापर्यंतचा प्रवास आनंदराज आंबेडकर यांनी सांगितला. सोमवारी (दि.15) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कामाची पाहणी करण्यास जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंबेडकरी चळवळ स्वत:च्या पायावर उभी करण्यासाठी आपण युती केली आहे. कार्यकर्ता उपाशीपोटी लढू शकत नाही. त्यामुळे कार्यकर्ता सक्षम झाला तर चळवळही सक्षम होईल, असेही ते म्हणाले.
ठाकरे ब्रॅण्ड चालणार नाही
दोन्ही ठाकरे एकत्र आले असले तरी, आगामी निवडणुकांमध्ये त्यांचा करिष्मा चालणार नसल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच शिंदे सेनेसोबत आम्हाला जागावाटपात 10 टक्के वाटा मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने नेहमीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कमी लेखण्याचे प्रयत्न केले आहे. काँग्रेसनेच बाबासाहेबांचा पराभव केला होता. त्यांना भारतरत्न देण्यासाठीदेखील व्ही. पी. सिंग यांचे सरकार येऊ द्यावे लागले, असेही आंबेडकर म्हणाले.