आडगाव : पुढारी वृत्तसेवा
अमृतधाम चौफुली परिसरात सुरू झालेल्या सीएनजी पंपामुळे हा चौक सध्या अपघातप्रवण क्षेत्र झाला आहे. या ठिकाणी सर्व्हिस रोड तसेच मुख्य रस्त्यावर कायमस्वरूपी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. अमृतधाम चौक हा रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, या चौकात अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहे.
या चौफुलीवर मुख्य चार रस्ते असून, अवजड वाहनांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत असून स्थानिक नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सीएनजी भरण्यासाठी तब्बल एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत असून, त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.
प्रशासनाने केवळ महसूलवाढीसाठी वाहन विक्री व परवानग्या दिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहनांची संख्या अधिक वाढणार असल्यामुळे या समस्येचे गांभीर्य अधिक वाढण्याची शक्यता आहे.
सीएनजीचा हा तुटवडा अजून किती दिवस चालणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. उभ्या असलेल्या वाहनांमुळे गेल्या महिन्यात या चौकात चार अपघात झाले असून, त्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
याच परिसरात अभियांत्रिकी महाविद्यालय असल्याने विद्यार्थी व नागरिकांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे गर्दीत अधिक भर पडते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून वाहतूक नियोजन करावे तसेच सीएनजी पुरवठ्याची योग्य व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
आम्ही या संदर्भात महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करणार आहोत. सध्या सीएनजीच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
-ऐश्वर्या जेजूरकर, नगरसेविका
मी या चौकाजवळ राहतो. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. महापालिकेने परवानगी देताना रस्त्याची व परिसराची परिस्थिती लक्षात घ्यावी तसेच सीएनजीचा पुरवठा वाढवावा.
ज्ञानेश्वर सोमवंशी, स्थानिक रहिवासी