

सिडको (नाशिक) : राजेंद्र शेळके
अंबड पोलिस ठाण्याला गेल्या पावणेतीन वर्षांत तब्बल नऊ वरिष्ठ पोलिस निरीक्षक लाभले. विशेष म्हणजे, यापैकी एकाही अधिकाऱ्याचा दोन वर्षांचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण झालेला नाही. नुकतेच नियुक्त झालेले वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांचीही केवळ चार महिन्यांतच गंगापूर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी जग्वेंद्रसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासमोर आगामी मनपा निवडणुका शांततेत पार पाडणे आणि वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीत अंबड ठाण्याला सर्वाधिक संवेदनशील मानले जाते. सिडको व अंबड भागात सतत वाढणारे गुन्हे रोखण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे पोलिस ठाण्याच्या कारभारात सातत्य राहिलेले नाही. अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीनुसार यंत्रणेच्या कामकाजात बदल होतो आणि त्याचा थेट परिणाम गुन्हेगारी नियंत्रण, तपास व स्थानिक प्रश्नांवर होणाऱ्या उपाययोजनांवर होतो.
मधुकर कड यांनी याआधी नऊ वर्षांपूर्वी अंबड ठाण्यात दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्या काळात त्यांनी गुंडगिरीवर प्रभावी कारवाई करत अनेक टोळ्या तुरुंगात डांबल्या, काहींना तडीपार केले व पोलिस गस्त वाढवून परिसरात कायदा-सुव्यवस्थेला बळकटी दिली. अलीकडील बदली प्रशासनिक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षेनुसार अंबडमध्ये दीर्घकाळ अनुभवसंपन्न अधिकारी असणे गरजेचे असल्याचे पोलिसांचेही मत आहे.
अंबड पोलिस ठाण्यातील निरीक्षकांचा कार्यकाळ
राकेश हांडे (४ महिने), नंदन बगाडे (दीड महिना), युवराज पक्ती (दीड महिना), सूरज बिजली (३ महिने), प्रमोद वाघ (६ महिने), दिलीप ठाकूर (६ महिने), सुनील पवार (७ महिने) आणि भगीरथ देशमुख (१५ महिने) इतकाच कार्यकाळ येथे राहिला आहे.