

Bhalekar school will reopen!
नाशिक : पुढारी वृत्तसेवा बी. डी. भालेकर शाळा बचाव समितीच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. शाळेच्या जागेवर विश्रामगृह उभारण्याचा महापालिकेचा निर्णय रद्द करण्यात आला असून, या ठिकाणी अद्ययावत शाळा सुरू करण्याचे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. सिंहस्थ कुंभमेळा निधीतून शाळेसाठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेची समितीसमवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन भुसे यांनी दूरध्वनीद्वारे दिले. शिवसेना शिंदे गटाचे उपनेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित करण्याची घोषणा राजू देसले आणि दीपक डोके यांनी केली.
नगरपालिका काळात बी. डी. भालेकर यांच्या निधीतून १९६७ या वर्षी भालेकर शाळेची उभारणी करण्यात आली होती. या शाळेची इमारत जीर्ण झाल्यामुळे धोकादायक झाल्याचा दावा करत इमारत पाडून त्या जागेवर विश्रामगृह उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्याविरोधात माजी विद्यार्थ्यांनी बी. डी. भालेकर भालेकर शाळा बचाव समिती स्थापन करत दोन आठवड्यांपासून आंदोलन सुरू केले होते. या समितीच्या वतीने १९ तारखेला महापालिकेवर मोर्चाही काढला जाणार होता.
मागील आठड्यातच आंदोलकांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनीही या ठिकाणी शाळाच व्हावी, या नाशिककरांच्या भावनांशी आपण सहमत असल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर शनिवारी (दि. १५) आंदोलनस्थळी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी भेट देऊन आंदोलकांची भूमिका जाणून घेतली.
त्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. भुसे यांनी विश्रामगृह बांधण्याचा निर्णय रद्द झाल्याची अधिकृत माहिती दिली व या ठिकाणी बी. डी. भालेकर शाळा बांधली जाणार असून, ती माझी जबाबदारी असल्याचे आश्वासन आंदोलकांना दिले, तर मनपा, नगरविकास विभाग आणि शिक्षण विभागाकडून पाठपुरावा करण्याचे आश्वासन बोरस्ते यांनी समितीला दिले. त्यानंतर राजू देसले, दीपक डोके, मनोहर पगारे, डॉ. ठकसेन गोराणे, अॅड. प्रभाकर वायचळे, पद्माकर इंगळे यांनी आंदोलन स्थगित केले.
सिंहस्थ निधीतून शाळेची उभारणी
नाशिकसाठी कुंभमेळा निधी मिळणार असून, त्यातून शाळेच्या निधीसाठी विशेष प्रयत्न केले जातील. तसेच समितीची बैठक लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित करून देण्याचेही यावेळी भुसेंनी मान्य केले, तर बी. डी. भालेकर शाळेसाठी सामाजिक न्याय विभागाकडून निधी देण्याचे आश्वासन मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्याचे बोरस्तेंनी आंदोलकांना सांगितले.