

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारतनगर येथील अजमेरी बेकरीवर अन्न प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान आवश्यक अन्न व्यवसाय परवाना नसल्याचे आणि उत्पादन व साठवणुकीच्या ठिकाणी अस्वच्छता आढळल्यामुळे विभागाने १५१ किलो अन्नपदार्थ जप्त केले आहेत. संबंधित बेकरीला तातडीने व्यवसाय बंद करण्याची नोटिसही बजावण्यात आली आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून 'फेस्टिव्हल ड्राइव्ह २०२६' ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत भारतनगर, वडाळा रोड परिसरातील मे. अजमेरी बेकरीची तपासणी करण्यात आली. यावेळी बेकरीकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक परवाना नसल्याचे आढळले.
तसेच अन्न सुरक्षा नियमांचेही उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी १४३ किलो केक आणि आठ किलो कपकेक असा एकूण १५१ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला.
संबंधित अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आले असून, उर्वरित साठा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे, नाशिक विभागाचे सहआयुक्त माने आणि सहायक आयुक्त (अन्न) व्ही. पी. धवड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील आणि संकेत येलमामे यांच्या पथकाने तपासणी केली.
तपासण्या सुरू राहणार
सणासुदीच्या काळात मिठाई, बेकरी उत्पादने आणि अन्य खाद्यपदार्थांची मागणी वाढते. या काळात अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानांकांचे पालन याबाबत प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.