नाशिक दिंडोरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात १७ तारखेला जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे अनुदान जमा करण्याचा प्रयत्न आहे. विरोधक यावर निवडणूक जुमला असल्याची टीका करत असले तरी कालच सहा काेटीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. आम्हाला जनतेने पुन्हा संधी दिल्यास ही योजना पुढील पाच वर्षदेखील चालूच राहिल, हा अजितदादाचा वादा असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेचा दिंडोरीतून शुभारंभ झाला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, अर्थसंकल्पात प्रत्येक घटकाचा विचार केला. शेतकर्यांसाठी नवसंजीवनीसारख्या योजना आणल्या. वर्षांला ५२ लाख कुटूंबांना तीन सिलिंडर मोफत देणार. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण, सर्व जाती धर्माच्या मुलींना उच्चशिक्षण मोफत, ४४ लाख शेतकर्यांना वीजबिल माफीचा फायदा, कांदानिर्यात सुरुच ठेवणार, दुधाला पाच रुपये अनुदान, सोयाबीन, कापूस या पिकाला हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान, शेतकर्यांना सोलरपंप देणार, ग्रामीण रस्ते विकास अशा विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पुर्वकडे वळवून मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी नार-पार योजनेला आंचारसंहितेपूर्वीच निधी देणार, त्याचबरोबर फक्त पिण्याच्या पाण्यासाठी टिटवी हे नवीन धरण बांधणार असून त्यासाठी केंद्राकडून अतिरीक्त निधी मिळवत प्रत्यक्षात प्रकल्प साकारणारच असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी प्रास्ताविकात, दिंडोरी उपजिल्हा रुग्णालयासाठी निधी आणला, परंतू जागेचा प्रश्न आहे. कृषी विभागाकडे असलेल्या जागेपैकी आवश्यक जागा उपजिल्हा रुग्णालयासाठी उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी कृषीमंत्र्यांकडे केली. मुंडे यांनी देखील तत्काळ संमती देत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
जनसन्मान यात्रेला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. जनसन्मान यात्रेसाठी गुलाबी बस होती. उपमुख्यमंत्र्यांनी याच बसमधून प्रवास केला. कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, युवक तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा संगिता राऊत, प्रकाश वडजे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमस्थळी लावलेल्या अनेक होर्डिंग्जवर ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांचे छायाचित्र होते. आमदार झिरवाळ आणि शेटे यांचे कटआउट प्रवेशद्वारावर लावले होते. त्यामुळे शेटे कार्यक्रमास येणार का? याची उत्सुकता होती. शेटे अजित पवार गटात प्रवेश करणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आणि चर्चेला पुर्णविराम मिळाला.
आदिवासी दिनी (९ ऑगस्ट) सार्वजनिक सुटी जाहीर करावी, यासाठी तीन महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतू, त्यात काही त्रुटी राहिलेत. तरी राज्यातील नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, पालघर, रायगड, पुणे, नांदेड, हिंगोली, अमरावती, नागपूर, गोदिंया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, भंडारा या आदिवासीबहुल जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांना मुख्यमंत्र्यांकडून सार्वजनिक सुटी देण्याचे आदेश झाले असल्याची माहिती झिरवाळ यांनी यावेळी दिली.
आदिवासींच्या प्रश्नावर आणि वनजमिनी संदर्भात केंद्रीय आदिवासी मंत्र्यांना पत्र लिहून खा. सुनील तटकरेंच्या माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी पत्र मराठीत लिहून दिले होते. मात्र, संसदेत इंग्रजी व हिंदी भाषा चालते. मला इंग्रजी येत नसल्याने मी खासदारकी लढवली नाही, असा मिश्किल टोला यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मारला.