अजंग येथील चिमुरडीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील अजंग येथील आठ वर्षीय चिमुरडीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (दि.११) विधी व न्याय विभागाला निर्देश दिले असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

अजंग येथील चिमुरडी भाविका (रिया) ज्ञानेश्वर महाले (८ वर्ष) हिचे १४ मे रोजी अपहरण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता दि.१५ मे रोजी तिचा मृतदेह गावाजवळील मोसम नदीपात्रालगत असलेल्या विहिरीत संशयास्पदरित्या आढळून आला होता. त्यामुळे या बालिकेचा खून झाल्याचा आरोप नातेवाईकांसह ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणामार्फत होऊन आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बालिकेच्या कुटुंबास न्याय मिळावा, म्हणून या घटनेची सुनावणी ही फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री भुसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभागाला आदेश दिले असून हा खटला आता फास्टट्रॅक कोर्टात चालणार आहे.

याप्रकरणी अजंग-वडेलसह तालुक्यातील ग्रामस्थांनी दोन दिवस नामपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते. संशयितांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिकाही कुटुंबीय व ग्रामस्थांनी घेतली होती. यावेळी मंत्री भुसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून मुलीच्या नातेवाईकांशी बोलणे करून न्याय मिळवून देण्याची हमी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सात दिवसात या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन थांबले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news