

पुढारी ऑनलाइन डेस्क | नाशिक मर्चेंट को-ऑपरेटीव्ह बँकेच्या मालेगाव शाखेत झालेल्या १९६ कोटी रुपयांच्या संशयित आर्थिक उलाढाल प्रकरणी ईडीने शुक्रवारी (दि. ६) मुंबई व अहमदाबादमध्ये छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी १३ कोटी ५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणात वसीम वलीमोहंमद भेसानिया उर्फ संजू नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
आरोपी सिराजने मालेगावमधील नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत अनेक बँक खाती उघडली होती. यामध्ये नागरिकांच्या केवायसी कागदपत्रांचा वापर करून त्यांनी शेतकऱ्यांना पैसे पाठवण्यासाठी नवा व्यवसाय सुरू करत असल्याचे भासवले होते. मालेगाव येथील व्यापाऱ्याने दोन बँकांमध्ये १४ खाती उघडून त्यातील रकमेचा निवडणुकीसाठी गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या खात्यांचा वापर करून तब्बल १९६ कोटी रुपयांचे व्यवहार केले गेले. या प्रकरणात मुख्य आरोपी मालेगावमधील सिराज मेमन असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
हा गैरव्यवहार १२०० कोटी रुपयांचा असल्याचा संशय असून बनावट कंपनीद्वारे २१ बँक खात्यांतून करण्यात आलेल्या ८०० कोटी रुपयांच्या व्यवहारांची माहिती ईडीला मिळाली आहे. त्यातील बहुसंख्य कंपन्या एकल मालकी असून त्या नवी मुंबई, सूरत,अहमदाबाद, उत्तर प्रदेश व दिल्ली येथील असल्याचे सांगितले जात आहे.
ईडीच्या तपासानुसार, नागाणी अक्रम मोहम्मद शफी व वासिम वलीमोहम्मद भेसानिया यांनी बनावट खात्यामधून मोठ्या प्रमाणत रक्कम काढल्याचे समजते. तसेच मुंबई, अहमदाबाद व सूरतमधील हवाला व्यावसायिकांनीही या खात्यातील रक्कम काढल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार नागाणी अक्रम शफी व वासिम भेसानिया यांना ईडीने अटक केली आहे.
ज्या कर्मचाऱ्यांचा बँक खाते उघडण्यासाठी केवायसीसाठी वापर करण्यात आला होता, त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. नोव्हेंबरमध्ये मुंबई, सुरत, अहमदाबाद आणि नाशिकमध्ये 25 ठिकाणी छापे टाकून 5.2 कोटी रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. पोलिसांनी चहाचे दुकान चालवणाऱ्या मालेगावमधील सिराज मेमन याला अटक केली. सिराज मेमननेच लोकांच्या नावाने खाती उघडली. हवाला चालवणारे इतरही लोक यात सामील असण्याचा ईडीला संशय असून अटक करण्यात आलेल्या आरोपींची ईडीने चौकशी सुरू केली आहे.