

नाशिक : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. 'हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?' असे वक्तव्य मंत्री कोकाटे यांनी केले आहे. मंत्री कोकाटे यांच्या वक्तव्यावर शेतकरी संघटनांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात मंत्री कोकाटे यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असतानाच त्यांनी हे वक्तव्य केले. मंत्री कोकाटे म्हणाले की, नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे सांगितले. तर शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहेत, असे विचारले असता मंत्री कोकाटे म्हणाले की, हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? जे कांदे वावरात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले, त्यांचे पंचनामे होणार नाहीत. त्याचे पंचनामे करणे अवघड आहे. ते नियमात बसत नाही, असे त्यांनी सांगितले. शेतात जी काही पिके असतील त्यांचे रीतसर पंचनामे होतील, असे मंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केले.
कृषिमंत्री कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोकाटे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांना 'भिकारी' म्हणत, तसेच कर्जमाफीची रक्कम लग्नासाठी खर्च केली जाते, असे वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता. आता कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावर शेतकरी संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
शेतकऱ्यांची अवहेलना करू नका. शेतकऱ्यांना मदत करता आली नाही तरी चालेल मात्र वारंवार बळीराजाचा अपमान होता कामा नये. केवळ सत्तेच्या मुजोरीतून हा अपमान केला जात आहे. पुन्हा बळीराजाला असे काही बोललल्यास रांगड्या भाषेत उत्तर दिले जाईल.
भारत दिघोळे, अध्यक्ष, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
अवकाळीने राज्यात सुमारे 27 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात 1 हजार गावे बाधित होऊन सुमारे 6 हजार 570 हेक्टर क्षेत्रावरील पीकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणाला देत मदतीचे सुतोवाच केले असताना कृषीमंत्री कोकाटे यांच्याकडून झालेल्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांची थट्टा केली जाते. लोकप्रतिनिधी असो की, शासकीय कर्मचारी यांच्याकडून शेतकऱ्यांचा सन्मान ठेवला जात नाही. नुकसानीचे पैसे मिळत नाहीत. मग, शेतीवर जाऊन पाहणी करण्याचा दिखावा कशासाठी करतात.
निवृत्ती न्याहारकर, जिल्हाध्यक्ष, अ. भा. कृषी शेतकरी संघटना