

नाशिक : किरण ताजणे
नवनवीन तांत्रिक शोध, संशोधन केवळ महानगरातील मोठमोठ्या प्रयोगशाळेत आणि संशोधन केंद्रात होते, त्यासाठी खूप उच्चशिक्षण घ्यावे लागते, असे नव्हे, तर शेतीच्या बांधावरही आणि कुठलेही 'रोबोटिक विज्ञान' न घेतलेल्या तरुणाईच्या मेंदूतूनही उपयुक्त संशोधन होऊ शकते, ही गोष्ट दिंडोरीतील तीन युवकांनी शब्दश: साकारली.
'कृषिबॉट' मोबाइलनियंत्रित रोबोट
जुन्या स्क्रॅपपासून निर्मित. खर्चही कमी
रोबोटमुळे शेतकऱ्यांना होणारा शारीरिक त्रास मोठ्या प्रमाणात कमी होतो.
स्मार्टफोनच्या साहाय्याने रोबोट नियंत्रण. यामुळे शेतकऱ्यांना शेतीत थेट उतरावे लागत नाही
शेतकरी कुटुंबातील तीन १७ वर्षीय युवकांनी पिकावर औषध फवारणीसाठी अभिनव संशोधन करून जुन्या भंगार साहित्यातून फवारणी करणारा उपयुक्त अनोखा 'रोबोट' तयार केला. आदित्य पिंगळे, परशुराम पिंगळे आणि अभिजित पवार यांनी भंगारापासून अनोखा रोबोट तयार केला आहे. 'कृषिबॉट' जो शेतकऱ्यांना फवारणी करताना होणारा शारीरिक त्रास कमी करतो. पिकावर फवारणी करताना शेतकऱ्याला फवारणीतील तीव्र औषधांमुळे त्रास सहन करावा लागतो. यापासून सुटका व्हावी यासाठी दिंडोरी तालुक्यातील अवनखेड गावातील तीन युवकांनी टाकाऊ भंगार साहित्यापासून 'कृषिबॉट' नावाचा मोबाइलनियंत्रित रोबोट तयार केला, जो पिकांवर फवारणी करतो. तो स्मार्टफोनच्या साहाय्याने नियंत्रित करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत थेट उतरावे लागत नाही. रोबोटमध्ये दोन डीसीची मोटार आणि १२ वॉटची बॅटरी बसवली आहे. फवारणीसाठी स्प्रिंकलर बसवले, टायर गतिमान व्हावे यासाठी मोटार कार्य करते. त्यावर फवारणीचा पंप बसवला असून, पंपातून पाइपद्वारे स्प्रिंकलरपर्यंत औषधी येऊन पिकांवर तुषार सिंचन होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे पंप उचलण्याचे कष्टही वाचतात आणि औषध फवारणीमुळे होणारे ॲलर्जीसारखे दुष्परिणामही टाळता येतात. रोबोटची बॅटरी एकदा चार्ज केली की, हा यंत्रमानव सुमारे एक ते दीड एकरवरील पिकांवर फवारणी करतो. रोबोटमुळे शेतकऱ्यांना होणारा शारीरिक त्रास मोठ्या प्रमाणात कमी होतो.
कमी खर्चात तयार झालेला कृषिबॉट पंचक्रोशीत काैतुकाचा विषय झालेला असून, असेच शेतीस उपयुक्त शोध लावून नवनवीन यंत्र, उपकरणे यांचा शोध लावून शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, युवकांचे हे संशोधन ग्रामीण भागातील शेतीस क्रांतिकारी पाऊल ठरले आहे.
माझे काका १६ लिटरने भरलेला पंप पाठीवर घेऊन सोयाबीनवर फवारणी करत. त्यामुळे त्यांच्या मणक्यात गॅप पडली आणि त्यांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास सुरू झाला. त्यातून फवारणीसाठी यंत्रमानव करण्याची कल्पना सुचली आणि कृषिबॉटची निर्मिती झाली.
आदित्य पिंगळे, कृषिबॉट रोबोटचा संशोधक.