

सिडको (नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील आडवण - पारदेवी येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी करण्यात येत असलेल्या जमीन अधिग्रहणासंदर्भातील याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला. जमीन अधग्रहीत करण्यासाठी सुरू असलेली प्रक्रिया कायद्यानुसारच राबवावी, असे स्पष्ट निर्देश देत न्यायालयाने शेतकऱ्यांची वैयक्तिक सुनावणी घेण्याचे आदेश दिले.
वायू प्रदूषण मुद्द्यावरही विचार करावा, असे नमूद करत उद्योगमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर न्यायालयाने ताशेरे ओढले. दरम्यान, अंतिम निर्णय होईपर्यंत 'जैसे थे' स्थिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाचे वकील ॲड. रामेश्वर गिते यांनी काम पाहिले. पत्रकार परिषदेत आडवण - पारदेवी येथील शेतकरी, माजी आमदार पांडुरंग गांगड, ज्ञानेश्वर कोकणे, विष्णू कोकणे, प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर उपस्थित होते. आडवण - पारदेवी येथील शेतकऱ्यांनी एमआयडीसीला जमीन देण्यास तीव्र विरोध केला होता. याशिवाय ग्रामसभा घेत बहुमताने जमीन देण्यास विरोध करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला होता. शेतकऱ्यांची बैठक उद्योगमंत्र्यांच्या दालनात पार पडली. मात्र, प्रशासनाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने स्पष्ट केले की, जमीन अधिग्रहणापूर्वी याचिकाकर्ते शेतकरी, संबंधित ग्रामसभा व पंचायत समितीने नोंदवलेल्या हरकतींचा विचार करणे बंधनकारक आहे. संबंधितांना सुनावणीची संधी देत हरकतींवर प्रथम कारणासहित निर्णय घ्यावा, असा निर्णय याचिकाकर्ते, ग्रामसभा आणि पंचायत समितीस लेखी स्वरुपात कळवल्यानंतरच अधिग्रहण प्रक्रिया राबवावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. यावेळी ज्ञानेश्वर कोकणे, तुकाराम कोकणे, सुरेश कोकणे, रमेश कोकणे, नवनाथ कोकणे, नामदेव कोकणे, रोहिदास शेलार, नारायण शेलार, बाळू गायकर उपस्थित होते.
शेतकऱ्यांत दिलासा मिळाल्याची भावना
जमिनीच्या ताब्याबाबत तसेच फेरफार नोंदी संदर्भात सध्या अस्तित्वात असलेली स्थिती अंतिम व योग्य निर्णय होईपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले. जमीन अधिग्रहण प्रक्रियेबाबत सर्व पक्षकारांचे आक्षेप व म्हणणे खुले ठेवण्यात आल्याचा आदेश न्यायमूर्ती आरती साठे व जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हा दिला. यामुळे आडवण - पारदेवीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.