

नाशिक : इगतपूरी तालुक्यातील आडवण-पारेगाव औद्योगिक वसाहतीच्या भूसंपादनाबाबतचा शेतकऱ्यांचा विरोध अखेर मावळला. बुधवारी (दि.११) मंत्रालयातील उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात शेतकऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्यात आला. खासदार राजाभाऊ वाजे यांनी यासंदर्भात यशस्वी मध्यस्थी केली. यावेळी उद्योगमंत्र्यांनी भूमीहिनांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले.
आडवण-पारेगाव येथे प्रस्तावित महिंद्रा कंपनीच्या ईव्ही प्रकल्पासाठी सुमारे सहाशे एकर जमीन आवश्यक आहे. याकरीता परिसरातील जमिनींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांचा जमीन भूसंपादनास विरोध असल्याने, प्रशासन विरुद्ध स्थानिक असा संघर्ष उभा ठाकला आहे. यापूर्वी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढत भूसंपादनास विरोध दर्शवला होता. खासदार वाजे यांनी शेतकर्यांची भेट घेत उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे बैठक लावली. यावेळी झालेल्या बैठकीत २ जूनपर्यंत भूसंपादनास स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर खासदार वाजे यांनी पुन्हा उद्योगमंत्र्यांशी चर्चा करत बैठक आयोजित केली. त्यानूसार बुधवारी (दि.११) मुंबई येथे झालेल्या बैठकीत खासदार वाजे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी ओंकार पवार, एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. शासनाने यापूर्वीच तालुक्यातील ५० टक्क्यांहून अधिक जमीन विविध प्रकल्पांसाठी संपादित केली आहे. नवीन उद्योगांसाठी पुन्हा एकदा शंभर एकरचे भूसंपादन केले जाणार आहे. बागायती व शेतीयोग्य भागातच हे संपादन केले जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी उद्योगमंत्री सामंत म्हणाले, आपला विरोध स्वाभाविक आहे. परंतु, जोपर्यंत सर्व्हेक्षण पूर्ण होणार नाही, तोपर्यंत कुणाची किती जमीन जाणार याचा निश्चित अंदाज येणार नाही. जर कोणी यात भूमिहीन होणार असेल तर त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, शेतकऱ्यांनी सर्वेक्षणास ग्रीन सिग्नल दिल्याने, आडवण पारेगाव येथील भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सदर जमिनीच्या संपादनानंतर नाशिकमध्ये येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा आढावा बैठक घेतली जाईल. खासदार वाजे तसेच शेतकरी प्रतिनिधींसमवेत पुन्हा एकदा चर्चा करून याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही मंत्री सामंत यांनी दिले. तसेच सहकार्य करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. दरम्यान, सर्व्हे झाल्यानंतर जेव्हा भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल, त्याआधी उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रशासन आणि शेतकरी यांची बैठक व्हावी, अशी मागणी खासदार वाजे यांनी केल्यानंतर मंत्री सामंत यांनी त्यास हिरवा कंदील दाखवला.
हा प्रश्न सामोपचाराने सुटणे आवश्यक आहे. शेतकरी इथले भूमिपूत्र आहेत. त्यांना विश्वासात घेऊनच पुढे पाऊल टाकले पाहिजे. आजची बैठक सकारात्मक झाली असून, उद्योगमंत्री आणि शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
राजाभाऊ वाजे, खासदार.