

ओझर : नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, तालुक्यांतील शेतकऱ्यांकडून ७९ लाखांच्या द्राक्षांची खरेदी करीत त्याचे पेसे न देता, फसवणूक केल्याप्रकरणी ओझर, पिंपळगाव बसवंत व दिंडोरी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दोन सहआरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. मुख्य संशयित हेमंतकुमार सिंगला पोलिसांनी बिहारमधून ताब्यात घेतले. त्याला पिंपळगाव न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली.
ओझर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये सहआरोपी नितीन जंगल रासकर (रा. ओझर) आणि कृष्णा रामनाथ निमसे (रा. नांदूर मळा) यांना अटक केली होती. निफाड तालुक्यातील वावी ठुशी येथील शेतकऱ्याची साडेसोळा लाखांची फसवणूक मुख्य संशयित हेमंतकुमार सिंगने केली होती. तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. पथकाने त्याचा शोध शिर्डी, राहाता, शनिशिंगणापूर, कोपरगाव, इगतपुरीसह बिहारमधील मोतीहारी व सुलतानगंज येथे घेतला होता.
संशयित बिरगंज (नेपाळ) येथून बिहारमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ओझर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शशिकांत सैंदाणे, मच्छिंद्र कराड, बाळू सांगळे यांनी चार दिवस सुलतानगंज येथे तळ ठोकला होता.
कावड यात्रेत सहभागी झालेल्या लाखो भाविकांतून हेमंतकुमार सिंगला ताब्यात घेतले. याबाबत पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक विमला एम, उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.