

A three-day-old baby girl was murdered by her own father.
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
'मुलगा म्हणजेच वंशाचा दिवा', अशी समजूत समाजात किती खोलवर रुजली आहे, याचा प्रत्यय देणाऱ्या घटनेने शुक्रवारी (दि. २६) संपूर्ण जळगाव जिल्ह्याला हादरून सोडले. तीन मुलींच्या पाठीवर पुन्हा मुलगीच झाल्यामुळे जन्मदात्या पित्यानेच अवघ्या तीनदिवसीय बालिकेचा खून केल्याची घटना जामनेर तालुक्यात घडली. या निर्दयी पित्याने चिमुकलीच्या डोक्यात पाट मारून तिचा खून केला. या प्रकरणी पहूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
कृष्णा लालचंद राठोड (२६, रा. मोराड, ता. जामनेर) असे या निर्दयी पित्याचे नाव आहे. त्याला आधीच तीन मुली आहेत. 'गळवारी (दि. २३) त्याच्या पत्नीने पुन्हा एका मुलीला जन्म दिला. मुलगा झाला नाही, या रागातून कृष्णा राठोडने गुरुवारी (दि. २५) सायंकाळी ६ च्या सुमारास रागाच्या भरात घरात असलेल्या लाकडी पाट तीन दिवसांच्या बालिकेच्या डोक्यात घातला.
यात गंभीर जखमी चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये कोणीही फिर्याद दाखल करण्यास तयार नव्हते. दरम्यान, याबाबत पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कोणीही फिर्याद देण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे अखेर पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार बाळकृष्ण शिंब्रे यांनी फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपी पित्याला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे अधिक तपास करीत आहेत.