

Municipal election: A new formula in Nashik?
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी अजित पवार गट व रिपाइं महायुतीचा नवा फॉर्म्युला चर्चेत आला आहे. त्यानुसार भाजपला ८०, शिवसेना ३५, राष्ट्रवादी ५ तर रिपाइंला दोन जागा देण्याचे निश्चित झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजप, शिंदे सेनेतील इच्छुकांची मोठी। संख्या महायुतीत अडथळा ठरण्याची शक्यता असल्याने जागावाटप निश्चितीच्या चर्चेने। इच्छुकांची धडधड मात्र वाढली आहे.
बंडखोरांवर मविआची नजर
'भाजपसह शिंदे गटाकडेही इच्छुकांची मोठी फौज आहे. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांची युती झाल्यास बंडखोरी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची या बंडखोरांवर नजर असणार आहे. महायुतीकडून ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, अशा प्रबळ उमेदवारांना महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी पायघड्या घातल्या जाण्याची शक्यता आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), रिपाइं महायुतीत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मुंबईत ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यानंतर भाजप-शिवसेनेनेदेखील मुंबई काबीज करण्यासाठी महायुतीचा निर्णय घेतला आहे. मुंबईपाठोपाठ नाशिकसाठीदेखील महायुतीचे प्रयत्न आहेत.
मित्र पक्षाच्या जागांच्या मागणीमुळे भाजपने थांबविलेल्या चर्चेला शुक्रवारपासून मुंबईत पुन्हा सुरुवात झाली. त्यात नाशिकमधील जागाटपाचाही फॉर्म्युला ठरल्याचे समजते. त्यात भाजपला सर्वाधिक ८० जागा त्या खालोखाल शिवसेनेला ३५ जागा, तर राष्ट्रवादी ५ आणि रिपाइंला २ जागा सोडण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना भाजपने नाशिकसाठी उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरातील भाजपच्या तिन्ही आमदारांनी मुंबई गाठत, संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा केली. आमदारांनी दिलेल्या पसंतीक्रमांवर आता वरिष्ठांकडून निर्णय घेतला जाणार आहे.
शिवसेना-राष्ट्रवादी युती
भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी अजित पवार गटात युतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. गुरुवारी यासंदर्भात शिवसेना कार्यालयात बैठक झाल्यानंतर शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत दुसरी फेरी शुक्रवारी (दि. २६) होणार होती; परंतु ही बैठक एक दिवस लांबल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले.