

सिन्नर : घोटी महामार्गावर शिवनदीवरील पुलाजवळ भाटवाडी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत आईसह चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि.20) रात्री 7.40 च्या सुमारास घडली. खड्ड्यांजवळ दुचाकीचा वेग कमी केल्यानंतर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यामुळे खड्ड्यांनी आईसह चिमुकलीचा बळी घेतल्याचा गंभीर आरोप करीत ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्तीला टाळाटाळ करणार्या अधिकार्यांवर रोष व्यक्त केला आहे. (A mother and a child were killed by the fatal potholes)
सुजाता निखिल पाचोरे (24) व नेत्रा निखिल पाचोरे (दीड वर्ष) असे मृत मायलेकीची नावे असून, निखिल सुनील पाचोरे (30, सर्व रा. भाटवाडी, ता. सिन्नर) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निखिल पाचोरे हे पत्नी सुजाता व मुलगी नेत्रा यांच्यासह सिन्नर येथून भाटवाडी येथे घराकडे परतत होते. शिवनदीवरील पुलाच्या पुढे गेल्यानंतर खड्ड्यांजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले होते.
आसपासच्या नागरिकांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह फरार झाला. दरम्यान, या अपघातात आई सुजाता व मुलगी यांचा मृत्यू झाला. निखिल यांना प्राथमिक उपचारानंतर नाशिक येथे हलविण्यात आले. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेने भाटवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घोटी महामार्गावर शिवनदीवरील पुलाच्या पुढे गेल्यानंतर बर्याच दिवसांपासून खड्डे पडलेले आहेत. ते दुरुस्त करण्याची मागणी महामार्ग प्राधिकरण अधिकार्यांकडे करण्यात आली होती. मात्र अधिकार्यांनी पावसाचे कारण देत दुरुस्तीकामात चालढकल केली. त्यांच्या हलगर्जीपणामुळे या मायलेकीचा बळी गेला आहे.
मनोज महात्मे, सरपंच, भाटवाडी, सिन्नर, नाशिक.