

नाशिक : शहरातील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर झालेला असून, अपघातांमुळे नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. आडगावजवळ धात्रक फाटा परिसरातील खड्ड्यात अपघातामुळे दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी (दि. ३) हा अपघात झाला होता. त्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान शनिवारी (दि. ५) मृत्यू झाला.
सविता संजू शिरसाठ (५०, रा. आडगाव) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. शहरात आठ दिवसांपूर्वीच गतिरोधकामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. त्यामुळे शहरातील अशास्त्रीय गतिरोधकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच आता खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध संतापाची लाट उसळत आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अपघात वाढले असून, खड्ड्यांमुळे अनेकांना शारीरिक इजाही होत आहेत. गुरुवारी सकाळी 8 च्या सुमारास सविता या त्यांच्या मुलासह सीबीएसच्या दिशेने जात होत्या. जत्रा हॉटेलजवळील खड्ड्यात दुचाकी आदळल्याने मागे बसलेल्या सविता खाली पडल्या. त्यात गंभीर मार लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान, त्यांचा दोन दिवसांनी मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील बहुतांश रस्ते खोदले असून, अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने खड्डेमय रस्ते झाले आहेत. असे असूनही त्यावर उपाययोजना झालेल्या नाहीत. पावसात रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली. गत महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांच्या ताफ्यावरही खड्डेमय रस्त्यांमुळे मार्ग बदलण्याची व वेग कमी करण्याची नामुश्की आली होती. त्यातच आता खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे जीव जात असल्याने प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप वाढत आहे.