80s Photo AI Trend: सोशल मीडियावर '80s एआय फोटो' ट्रेंडचा धुमाकूळ; पण 'डीपफेक'चा मोठा धोका, या गोष्टी ठेवा लक्षात

80s Photo AI Trend | 80 च्या ट्रेंडची 'शान' ; सुरक्षेचे ठेवा 'भान'
80s Photo AI Trend
80s Photo AI Trend
Published on
Updated on

नाशिक : सतीश डोंगरे
ऐंशीच्या दशकातील कपडे, घरांची रचना, सायकली, शाळेचे दिवस, गावाची जत्रा किंवा कुटुंबासोबतचे जुन्या काळातील क्षण... सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून अशा आठवणींना नव्याने दृश्यरूप देण्याचा ट्रेंड चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. काही सेकंदांत तयार होणारे हे छायाचित्र इतके वास्तवदर्शी दिसते की, ते खरोखर त्या काळात काढले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) तयार केले आहे, हे ओळखणे कठीण जाते. मात्र, या मनोरंजनामागे सायबर गुन्ह्यांचा गंभीर धोका दडलेला असल्यामुळे ८० च्या ट्रेंडची 'शान' जपताना, डिजिटल सुरक्षिततेचे भान ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सायबर तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

80s Photo AI Trend
Shalarth ID scam | नाशिक विभागातील 841 शालार्थ आयडी बनावट! जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 638 प्रकरणांचा फटका

'एआय'च्या अफलातून क्षमतेमुळे अनेकांच्या बालपणाच्या आठवणींना पुन्हा रंग मिळत असला, तरी या आनंदाच्या प्रवासात खबरदारी आवश्यक आहे. कारण ८० च्या दशकातील फोटो तयार करण्यासाठी आपला चेहरा असलेले छायाचित्र ज्या संकेतस्थळावर किंवा ॲपवर अपलोड केले जात आहे, त्या सेवेचे गोपनीयता धोरण काय आहे आणि अपलोड केलेल्या छायाचित्राचा वापर कसा प्रकारे केला जाऊ शकतो, याची माहिती घेणेही आवश्यक आहे.

खरे तर या ट्रेंडबाबत फार मोठी भीती बाळगण्याची गरज नसली, तरी अंधविश्वासही ठेवता कामा नये, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. विश्वासार्ह एआय सेवा वापरणे, तिच्या गोपनीयता अटी वाचणे आणि अनावश्यक वैयक्तिक माहिती देणे टाळणे, एवढी प्राथमिक काळजी घेतली, तरी धोका कमी करता येतो. लहान मुलांचे फोटो, घराचा पत्ता किंवा आतील रचना स्पष्ट दिसणारी छायाचित्रे, ओळखपत्रे, कागदपत्रे वा अन्य संवेदनशील माहिती असलेले फोटो अनोळखी सेवांवर अपलोड करणे टाळायला हवे, असे आवाहन सायबर तज्ज्ञांकडून केले जात आहे.

ट्रेंडचा आनंद घ्या पण...

तंत्रज्ञानामुळे जुन्या आठवणींना नवा स्पर्श मिळत असेल, तर त्या आनंदाला नकार देण्याचे कारण नाही. ८० च्या काळात न जगलेल्या पिढीलाही त्या काळाची झलक अनुभवता येत आहे, तर त्या काळातील पिढीला आपले बालपण पुन्हा पाहता येत आहे. त्यामुळे हा ट्रेंड आनंद देणारा आणि सर्जनशील आहे. फक्त फोटो तयार करताना आणि तो शेअर करताना, दोन क्षण डिजिटल सुरक्षिततेचा विचार करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

भावनिक फसवणुकीलाही खतपाणी

सायबर गुन्हेगार 'एआय'च्या माध्यमातून तयार केलेल्या वास्तवदर्शी छायाचित्रांचा वापर सामाजिक अभियांत्रिकीसाठी करू शकतात. जुन्या आठवणी, कुटुंब, मैत्री किंवा भावनिक नात्यांचा आधार घेत बनावट ओळख निर्माण केली जाऊ शकते. त्यानंतर विश्वास संपादन करून वैयक्तिक माहिती, आर्थिक तपशील किंवा अन्य संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

८० ट्रेंड आनंद देणारा ठरत असला, तरी...

त्यातून धोकाही मोठा आहे. न मागताच आपण आपले फोटो 'एआय'ला सुपूर्द करीत आहोत. या ट्रेंडमध्ये चेहरा सोडून सर्वच बदलत असल्यामुळे 'डीपफेक'चा धोका मोठा आहे. त्यामुळे व्हिडिओ, फोटो शेअर करताना भान ठेवायला हवे.

सायबर सुरक्षिततेसाठी 'चार' नियम

  • कोणतेही वैयक्तिक छायाचित्र अनोळखी 'एआय' सेवांवर अपलोड करू नये.

  • 'एआय' ॲपची गोपनीयता धोरण आणि छायाचित्रांच्या वापराबाबतच्या अटी तपासायच्या.

  • तयार केलेल्या 'एआय' छायाचित्राला 'एआय निर्मित' असा स्पष्ट उल्लेख करावा.

  • सामाजिक माध्यमांवर दिसणारे वास्तवदर्शी छायाचित्र.

80s Photo AI Trend
Nashik Ayushman Bharat Card | नाशिक जिल्ह्यात 64 टक्के नागरिक आयुष्यमान कार्डपासून वंचित! रेशनकार्डचा मोठा अडसर

'डीपफेक'चा वाढला धोका

एआय तंत्रज्ञानामुळे एखाद्या व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरावर किंवा वेगळ्या प्रसंगात सहज बसवता येतो. अशा पद्धतीने तयार केलेले बनावट छायाचित्र किंवा चित्रफीत खऱ्यासारखी भासू शकते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिमा, प्रतिष्ठा आणि सामाजिक विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते. आज केवळ मनोरंजनासाठी तयार केलेले छायाचित्र भविष्यात चुकीच्या संदर्भात वापरले जाण्याची शक्यता असल्यामुळे अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

'जुना फोटो' म्हणजे सत्य नव्हे!

'एआय'मुळे केवळ व्यक्तींचे फोटोच नव्हे, तर गाव, शहर, ऐतिहासिक घटना, संस्था किंवा एखाद्या जुन्या प्रसंगाचे काल्पनिक छायाचित्रही तयार करता येते. असे छायाचित्र '१९८० मधील खरा फोटो' किंवा 'जुन्या काळातील दुर्मीळ छायाचित्र' म्हणून सामाजिक माध्यमांवर पसरवले गेल्यास चुकीची माहिती प्रसारित होऊ शकते. त्यामुळे 'एआय'च्या माध्यमातून तयार केलेल्या छायाचित्रावर 'एआय निर्मित' किंवा 'एआयच्या माध्यमातून केलेली काल्पनिक पुनर्निर्मिती' असा स्पष्ट उल्लेख करणे योग्य ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news