Nashik Politics | जिल्ह्यातील १४ जागांसाठी ७८ इच्छुक
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे उमेदवारीसाठी ओघ वाढला आहे. पक्षातर्फे घेण्यात आलेल्या मुलाखतींवेळी जिल्ह्यातील १४ जागांसाठी तब्बल ७८ इच्छुकांनी तिकीट मागितले आहे. देवळालीत सर्वाधिक २० इच्छुकांनी मुलाखती दिल्या असून, बागलाण व दिंडाेरीत उमेदवारीसाठी रस्सीखेच असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. (There has been an increase in the number of aspirants candidates for the NCP Sharad Chandra Pawar group in the district in the assembly elections)
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत चर्चांना वेग आला असताना पवार गटाने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्याच्या मुलाखती सोमवारी (दि. ७) पुणे येथे पार पडल्या. पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, फौजिया खान, खा. नीलेश लंके व भास्कर भगरे तसेच आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या.
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागांसह राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे लोकसभेचे यश बघता पवार गटाकडून जिल्ह्यातून लढण्यासाठी अनेक इच्छुकांनी तयारी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १४ जागांसाठी तब्बल ७८ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. दरम्यानच्या काळात आघाडीतील जागावाटपात जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा सुटणार हे अद्यापही अंतिम झालेले नाही, असे असताना पवार गटाकडे उमेदवारीसाठी रीघ लागली आहे. त्यामुळे तिकीट देताना पक्षाचा कस लागणार आहे.

