

नाशिक : पावसामुळे नुकसान झाल्यामुळे भरपाईसाठी शासन स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांकडून पावले उचलत भरपाई वितरीत करण्यासाठी अडचणीचा ठरणारा फार्मर आयडी सर्व शेतकऱ्यांनी काढावेत यासाठी सूचना दिल्या आहेत.
राज्य शासनातर्फे ॲग्रिस्टॅक (फार्मर आयडी) प्रकल्पाची सुरुवात २९ एप्रिल रोजी झाली. शेतकऱ्यांना एकाच क्रमांकावर शेतीसंबंधी सर्व माहिती शासकीय योजना, अनुदान, हवामान अंदाज तसेच इतर लाभ एका छताखाली उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने हा प्रकल्प सहा महिन्यांपासून राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांत अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार केलेले नाही.
ऑक्टोबरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देताना अडचणी आल्या. जिल्ह्यात शेतकरी संख्या ७ लाख ८४ हजार ७३६ असून, त्यापैकी ६ लाख ९ हजार ६३८ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार केले आहेत. अजूनही १ लाख ७५ हजार ९८ शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे. जिल्ह्याची टक्केवारी ७७.६९ आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंडळनिहाय दि. २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत विशेष कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात राहिलेल्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी तसेच ई - केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. योजनेच्या १०० टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व तहसील व मंडळ कार्यालयांना आवश्यक साहित्यांसह उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. ग्राममहसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची यादी करत तातडीने किसान कार्ड तयार करण्याच्या सूचना दिल्या.
बागलाणमधील १९,६६० शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार करण्याचे बाकी आहे. दोन दिवसांत ४०० हून अधिक शेतकऱ्यांनी या कॅम्पमध्ये सहभाग घेत फार्मर आयडी तयार केले. फार्मर आयडी होताच ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीची भरपाई वितरीत करण्यात येईल.
महेश शेलार, उपविभागीय अधिकारी