Nashik News : रस्त्यांवरील बेवारस वाहने होणार जप्त, वाहनमालकांना सात दिवसांचा अल्टिमेटम | पुढारी

Nashik News : रस्त्यांवरील बेवारस वाहने होणार जप्त, वाहनमालकांना सात दिवसांचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विशेष स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून शहरातील रस्त्यांवर बेवारस उभी असलेली वाहने जप्त करण्याची कारवाई महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. ही वाहने हटविण्यासाठी महापालिकेने संबंधित वाहनमालकांना सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गत आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी या दौऱ्यात श्री काळाराम मंदिरात दर्शन घेत अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले. इतकेच नव्हे, तर त्यांनी स्वत: श्री काळाराम मंदिराच्या आवारात स्वच्छताही केली. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने संपूर्ण शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. ही मोहीम दि. 31 जानेवारीपर्यंत राबविली जाणार आहे. ‘डीप क्लिनिंग’ असे या स्वच्छता मोहिमेला नाव देण्यात आले आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून शहरातील विविध रस्त्यांवर, गॅरेजसमोर बेवारस उभ्या असलेल्या व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. यासाठी महापालिकेने कलम २३० व २४३ अनुसार शहरातील बेवारस वाहनांचे मालक-चालक गॅरेजधारक व वापरकर्त्यांना जाहीर नोटीस बजावली आहे. महापालिका हद्दीतील रस्ते, पूल, फुटपाथ, उड्डाणपुलाखालील भागात बेवारस सोडून दिलेली वाहने हटविली जाणार आहेत.

जप्त वाहनांचा होणार लिलाव

संबंधित वाहनमालकांना ही वाहने हटविण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत ही वाहने न हटविल्यास महापालिकेकडून जप्तीची कारवाई केली जाणार आहे. जप्त केलेली वाहने जाहीर लिलाव काढून विकली जाणार असून, त्यातून गाड्या उचलण्याचा खर्च वसूल केला जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button