सिंहस्थ आराखड्यातून ५०० कोटींची कामे वगळणार

राज्य शासनाला ३१ जुलैपर्यंत सुधारित आराखडा सादर होणार
Nashik Kumbh Mela
Nashik Kumbh Melafile photo

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १७ हजार कोटींचा अवाजवी आराखडा तयार करणाऱ्या महापालिकेची जिल्हा प्रशासनाने कानउघाडणी केल्यानंतर सुधारित आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे ५०० कोटींची अनावश्यक कामे या आराखड्यातून वगळण्याचा निर्णय आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी घेतला आहे. यात नवीन मलनिस्सारण केंद्रांच्या निर्मितीसह सुमारे १०० किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. विभागीय महसूल आयुक्तांच्या निर्देशांनुसार येत्या ३१ जुलैपर्यंत सुधारित सिंहस्थ आराखडा राज्य शासनाला सादर केला जाणार आहे.

Summary

Nashik Kumbh Mela 2027 : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. करंजकर यांनी स्वतः सलग पाच दिवस सिंहस्थ आराखड्यातील प्रस्तावित कामांची स्थळपाहणी करत प्राधान्यक्रम निश्चित केला. त्यानुसार तूर्तास गरज नसलेली सुमारे ५०० कोटींची कामे आराखड्यातून वगळण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोटीच्या कोट्टी उड्डाणे घेत महापालिकेने रिंगरोडच्या मिसिंग लिंकच्या भूसंपादनासह सुमारे १७ हजार कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. गत सिंहस्थात महापालिकेच्या १०५२ कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती. यंदा मात्र सिंहस्थ आराखड्यातील प्रस्तावित कामांची आकडेमोड अवास्तव दिसत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने महापालिकेची कानउघाडणी केली होती. त्यातच विभागीय महसूल आयुक्तपदी डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासारख्या कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने सिंहस्थ आराखड्यातील अनावश्यक कामे वगळून सुधारित आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला गेला. ३१ जुलैपर्यंत सर्व विभागांचा एकत्रित सिंहस्थ आराखडा राज्य शासनाकडे पाठवण्याची तयारी विभागीय आयुक्त गेडाम यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. करंजकर यांनी स्वतः सलग पाच दिवस सिंहस्थ आराखड्यातील प्रस्तावित कामांची स्थळपाहणी करत प्राधान्यक्रम निश्चित केला. त्यानुसार तूर्तास गरज नसलेली सुमारे ५०० कोटींची कामे आराखड्यातून वगळण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

असा आहे प्रारूप सिंहस्थ आराखडा

  • बांधकाम विभाग : ३७५० कोटी

  • पाणीपुरवठा : १००० कोटी

  • सांडपाणी व्यवस्थापन : २४९१ कोटी

  • विद्युत व्यवस्था : १६७ कोटी

  • घनकचरा व्यवस्थापन : १५१ कोटी

  • वैद्यकीय विभाग : ५५५ कोटी

  • आपत्कालीन व्यवस्थापन : ३२ कोटी

  • उद्यान : ४१ कोटी

  • आयटी/जनसंपर्क : १९ कोटी

Nashik Kumbh Mela
Nashik | सायबर सिक्युरिटीत रोजगारसंधी दुप्पटअसल्याचा अहवाल

१०० कि.मी. रस्त्यांना कात्री

आगामी सिंहस्थकाळात पाच कोटी भाविक येण्याची शक्यता लक्षात घेत येणाऱ्या साधू-महंत व भाविकांना सेवा सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने १७ हजार कोटींचा आराखडा तयार केला गेला. याअंतर्गत साधुग्रामसाठी तीन आखाडे तसेच ११०० खालशांसाठी पाचशे एकर जागेवर मंडप उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. गत सिंहस्थात महापालिका हद्दीत ७ पूल व २२९ कि.मी. लांबीचे रस्ते तयार करण्यात आले होते. यंदा २१ नवीन पुलासह ३५० किमीचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. मात्र, आता आराखड्याला कात्री लावण्यात आल्याने प्रस्तावित रस्ते कामांपैकी १०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे वगळली जाणार आहेत. पूर्वीच्या साडेसहा किमीच्या घाटाची डागडुजी करताना २ किमी लांबीच्या घाटांची नव्याने निर्मिती केली जाणार आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १७ हजार कोटींचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यातील कामांसाठी प्राधान्यक्रम ठरवून आठवडाभरात सुधारित आराखडा तयार केला जाईल. ३१ जुलैपर्यंत सर्व विभागांचा एकत्रित आराखडा शासनाला सादर केला जाणार आहे.

- डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news