

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पात्र कुटुंबांना अन्नाचा लाभ मिळावा, यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून धान्य वितरणावर भर देण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील ३६ लाख ६२ हजार ११७ लाभार्थ्यांना ऑनलाइन प्रणालीद्वारे धान्य वितरण करण्यात आले.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांसाठी गहू, तांदूळ आणि ज्वारीच्या ४ लाख २७ हजार ४०० क्विंटल धान्य नियतनस मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, २५ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात ३ हजार ५२४ नवीन शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले.
शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने गुरुवारी (दि. २२) दुष्काळी तालुक्यांतील गरजू लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमंतर्गत पात्र लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील वितरण प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुरवठा विभागाकडून कार्यवाही सुरू आहे.
यासाठी जिल्ह्यातील शासकीय गोदामांची एकूण साठवणक्षमता ५ लाख ८ हजार ८८० क्विंटल आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरसाठी मंजूर ४ लाख २७ हजार ४०० क्विंटल धान्यापैकी २ लाख २६ हजार ८२० क्विंटल धान्याची उचल पूर्ण झाली आहे. उर्वरित धान्याची उचल करून, रास्त भाव दुकानांमार्फत लाभार्थ्यांपर्यंत वितरण करण्याचे नियोजन आहे.
सप्टेंबरमध्ये अंत्योदय अन्न योजनेतील ७ लाख २६ हजार ३०३, तर प्राधान्य कुटुंब योजनेतील २९ लाख ३५ हजार ७१४ लाभार्थ्यांना धान्याचा लाभ मिळाला. गत महिन्यात नवीन शिधापत्रिकेत अंत्योदय अन्न योजनेच्या २२५, तर प्राधान्य कुटुंब योजनेच्या ३ हजार २९९ शिधापत्रिकांचा समावेश आहे. यामुळे अंत्योदय योजनेतील ८०२ आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील १२ हजार ८८ अशा एकूण १२ हजार ८९० लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. याशिवाय, जुन्या शिधापत्रिकांमध्ये ७ हजार २०७ नवीन सदस्यांची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, दुष्काळामुळे स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी 'पोर्टेबिलिटी' सुविधेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे. आधार जोडणी, उत्पन्नाची पडताळणी आणि पात्र लाभार्थ्याचा योजनेंतर्गत समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतेही पात्र कुटुंब हे धान्याच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी यंत्रणेने समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी केले आहे.
जिल्ह्यात सर्व पात्र लाभार्थ्यांना नियमित धान्यपुरवठा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नव्याने धान्याची मागणी करणाऱ्या लाभार्थ्यांनाही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ धान्यपुरवठा करण्यात येत असून, गत महिन्यात ३ हजार ५२४ नवीन शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे.
— रमेश गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी