

301 firecracker stalls in the Nashik city on the occasion of Diwali
नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यंदा शहरातील तब्बल ३० ठिकाणी ३०१ फटाके स्टॉल्सची उभारणी केली जाणार आहे. या फटाके स्टॉल्सच्या जागांसाठी महापालिकेमार्फत येत्या ६ ऑक्टोबरला लिलाव आयोजित करण्यात आले आहेत. सहाही विभागीय कार्यालयांमध्ये हे लिलाव होणार आहेत.
दिवाळीत फटाके विक्री स्टॉल्सच्या जागांसाठी महापालिकेतर्फे दरवर्षी लिलाव आयोजित केले जातात. मात्र, या फटाके स्टॉल्सच्या लिलावावरून दरवर्षीच वाद २ उभे राहतात. कधी पोलिसांच्या परवानगीचा, तर कधी स्टॉल्सधारकांच्या असहकारामुळे गेल्या चार वर्षांपासून महापालिकेच्या लिलाव प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
यंदा सहाही विभागांतील ३० ठिकाणी तब्बल ३०१ फटाके विक्री स्टॉल्सची उभारणी केली जाणार आहे. यामध्ये नाशिक पश्चिम विभागात ६० फटाके स्टॉल्सची उभारणी केली जाणार आहे. यामध्ये गोल्फ क्लब ईदगाह मैदानावरील ५० फटाके स्टॉल्सचा समावेश आहे.
पंचवटी व नाशिकरोड भागात प्रत्येकी ६९ फटाके स्टॉल्स असणार आहेत. सातपूरला ५१, सिडकोत ३६, तर नाशिकपूर्व विभागात १६ फटाके स्टॉल्स उभारले जाणार आहेत. या स्टॉल्सकरिता महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांमध्ये त्या-त्या क्षेत्रातील स्टॉल्सकरिता ६ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता लिलाव होणार आहेत.
प्रथम लिलावात प्रतिसाद न मिळालेल्या जागांकरिता दुसऱ्या दिवशी ७ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता लिलाव होतील. लिलावात भाग घेण्यापूर्वी प्रत्येक स्टॉलच्या जागेकरिता १५ हजार रुपये अनामत रक्कम आगाऊ भरावी लागणार आहे.