लासलगाव : केंद्र सरकारने शेतकरीवर्गाचा असंतोष कमी करण्यासाठी १३ सप्टेंबरला ५५० डॉलरचे निर्यातमूल्य रद्द, तर निर्यातशुल्क ४० टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आणले. मात्र त्या संदर्भातील प्रसिद्ध नोटिफिकेशनवर तत्काळ अंमलबजावणी झाली नाही. 'कस्टम'च्या वेबसाईटवर नोटिफिकेशन अपडेट न झाल्याने बांगलादेश व नेपाळ सीमेवर कांद्याचे १०० ट्रक उभे असून, मुंबई व तामिळनाडूमधील तुतीकुरीन बंदरावर २०० ट्रक खोळंबले आहेत. त्यांना नोटिफिकेशन सिस्टीम अपडेट होण्याची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, वाणिज्य मंत्रालय सूत्रांकडून दुपारनंतर सदर सिस्टीम अपडेट होईल, असे सांगण्यात आले. वेळेत कार्यवाही न झाल्यास बंदरावरील अपेक्षित जहाजे निघून गेल्यास निर्यातदारांना पुढील व्यवस्थेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कांदा नाशवंत माल आहे. तो जास्त दिवस ट्रकमध्येच राहिल्यास नुकसान होऊ शकते. याचा परिणाम पुढील काळात कांद्याचे दर पडण्यावर होऊ शकतो, त्यामुळे निर्यातबंदी झाल्यानंतर ती तत्काळ लागू होते, मग बंदी मागे घेतल्यानंतरच्या कार्यवाहीत एवढा वेळकाढूपणा कशाला?
सुनील गवळी, शेतकरी, ब्राह्मणगाव विंचूर