

लासलगाव : राकेश बोरा
शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या निमगाव वाकडा येथील रेणुकामाता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भक्तीचा जागर सुरू झाला आहे. मनोकामना पूर्ण करणारे आणि दुःखांचे निवारण करणारे जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ख्याती आहे. येथे नवरात्र काळात पंचक्रोशीसह दूरवरून येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होत असून, देवीच्या दर्शनासाठी मंदिरासमोर लांबच लांब रांगा लागत आहेत.
भावसार समाजाचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या या मंदिराला सुमारे १५० वर्षांची भक्तिपरंपरा लाभली आहे. निमगाव वाकडा येथील रेणुकामाता मंदिराला रंजक आणि श्रद्धेने ओतप्रोत भरलेला इतिहास आहे. भावसार (प्रयागे) कुटुंबातील रंगोजी गोविंद भावसार हे देवीचे निस्सीम भक्त होते.
त्याकाळात त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. जुने आणि नवीन कपड़े रंगवण्याचा त्यांचा व्यवसाय होता. लासलगाव आणि परिसरात ते रंगारी म्हणून परिचित होते. ते व्यवसायानिमित्त दररोज कपडे घेऊन निमगाव वाकडा येथील नदीवर जात असत.
कपडे धुऊन वाळत घातल्यानंतर जवळच्या झाडाखाली भोजन करून ते काही वेळ विश्राम करीत. एके दिवशी त्यांना स्वप्नात देवीचा दृष्टांत झाला. आपण दररोज ज्या झाडाखाली विश्राम घेतो, त्याच ठिकाणी देवी असल्याचे आणि तिला जमिनीतून बाहेर काढण्याचे निर्देश त्यांना स्वप्नात मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते.
या दृष्टांतानंतर रंगोजी भावसार यांनी झाडाखाली खोदकाम केले. त्यावेळी त्यांना देवीच्या दोन मूर्ती आढळल्या. या घटनेमुळे त्यांना अत्यानंद झाला. त्यांनी मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या सहाय्याने त्या ठिकाणी छोटेसे मंदिर उभारले. तेव्हापासून या ठिकाणी देवीची पूजा - अर्चा सुरू झाली. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते.
तेजस्वी रूपाने भाविकांना आकर्षण:रेणुकामातेचे तेजस्वी डोळे, कपाळावरील मोठा कुंकुमतिलक, आकर्षक रूप भाविकांचे लक्ष वेधून घेते. देवीच्या दर्शनाने मनाला शांतता आणि संकटाचा सामना करण्याचे बळ मिळते, अशी भाविकांची भावना आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवस्थानाची परिसरात विशेष ओळख आहे. रंगोजी भावसार यांनी लावलेल्या भक्तीच्या रोपट्याची वटवृक्ष आजही भाविकांना सावली प्रदान करीत आहे.