

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या अंतिम परीक्षेत 124 केंद्रांवर 366 कॉपीचे प्रकार आढळून आले. याबाबत बोर्डाने कठोर भूमिका घेतली असून, या केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. ५) जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला. दरम्यान, परीक्षेदरम्यान राज्यातील नऊ विभागांतील 124 केंद्रांवर कॉपीचे प्रकार आढळून आले होते, याबाबत परीक्षा मंडळाने कठोर निर्णय घेतला असून, या 124 केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागांतील 124 परीक्षा केंद्रांवर 366 कॉपी केसेस समोर आल्या. ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार आढळून येतील, त्या केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा परीक्षा मंडळाने अगोदरच केली होती. त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा 97.35 टक्के, कला शाखेचा 80.52 टक्के, वाणिज्य शाखेचा 92.68 टक्के, व्यवसाय अभ्यासक्रमाचा 83.26 टक्के, आयटीआयचा निकाल 82.03 टक्के लागला आहे.