नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. ५) जाहीर केला. नाशिक विभागाचा एकूण निकाल 91.31 टक्के इतका लागला. निकालात यंदाही मुलींनी मुलांपेक्षा अधिक सरस आणि दमदार कामगिरी करीत बाजी मारली आहे. नाशिक माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाष बोरसे आणि विभागीय सचिव एम. एस. देसले यांनी पत्रकार परिषदेत निकाल घोषित केला.
नाशिक विभागाची स्थिती
प्रविष्ट मुले - 85,208
प्रविष्ट मुली - 72,634
एकूण - 1,57,842
उत्तीर्ण मुले - 76,214
उत्तीर्ण मुली - 67,922
एकूण - 1,44,136
शेकडा प्रमाण
मुले - 89.44
मुली - 93.51
एकूण -91.31
यंदा नाशिक विभागातून बारावीच्या परीक्षेसाठी एकूण एक लाख ५८ हजार ५९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख ५७ हजार ८४२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यामध्ये 85 हजार 208 मुले आणि 72 हजार 634 मुलींचा समावेश होता. निकालानुसार 76 हजार 214 मुले आणि 67 हजार 922 मुली उत्तीर्ण ठरल्या. एकूण एक लाख ४४ हजार १३६ विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून, विभागाचा एकंदर निकाल समाधानकारक ठरला आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.४४ टक्के, तर मुलींचे ९३.५१ टक्के इतके आहे. त्यामुळे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच आघाडी घेतली आहे.
नाशिक विभागात 75 टक्क्यांच्या पुढे 21 हजार 105 विद्यार्थी, 60 टक्क्यांच्या पुढे 59 हजार 511, 45 टक्क्यांच्या पुढे 54 हजार 838 तर 35 टक्क्यांच्या पुढे 8 हजार 682 विद्यार्थ्यांनी गुण मिळविले. राज्यातील नऊ विभागांमध्ये नाशिक विभागाचा सातवा क्रमांक लागला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नाशिक विभागाचा निकाल 3.4 टक्क्यांनी घसरला आहे. मागील वर्षी 94.71 टक्के निकाल लागला होता, तर यंदा हाच निकाल 91.31 टक्के इतका लागला आहे. दरम्यान, नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यानेच प्रथम स्थान पटकविले. जिल्ह्याचा निकाल 95.61 टक्के लागला आहे.
नाशिक जिल्ह्यातून 71 हजार 120 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 69 हजार 912 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नाशिक विभागांमध्ये जळगाव जिल्ह्यात 44 हजार 736 विद्यार्थी हे प्रविष्ट झाले होते, त्यापैकी 42 हजार 295 विद्यार्थी (९४.५२ टक्के) उत्तीर्ण झाले. नंदुरबार जिल्ह्यात 16 हजार 916 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 14 हजार 654 विद्यार्थी (८६.६२ टक्के) उत्तीर्ण झाले. धुळे जिल्ह्यात 23 हजार 70 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. त्यापैकी 17 हजार 275 विद्यार्थी (74.88 टक्के) उत्तीर्ण झालेले आहेत.